नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 17:16 IST2022-08-23T17:15:24+5:302022-08-23T17:16:54+5:30
नागपुरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ सेवा देत असल्याच्या तक्रारी आरटओकडे आल्या.

नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त
सुमेध वाघमारे
नागपूर : दुचाकीवरून प्रवासी वाहतूकीवर बंदी असताना ‘रॅपिडोची बाइक टॅक्सी’ची सेवा धडाक्यात सुरू आहे. यावर जरब बसविण्यासाठी आरटीओचे निरीक्षक बनावट (डमी) ग्राहक बनून बाईक टॅक्सीवर कारवाई करीत आहेत. सोमवारी अशा तीन बाईक जप्त करण्यात आल्या. याशिवाय, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा, कार व महेंद्रा मॅक्सवरही कारवाई करण्यात आली.
कोणत्याही वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून परवाना मिळविणे आवश्यक असते. नागपुरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ सेवा देत असल्याच्या तक्रारी आरटओकडे आल्या. त्याला गंभीरतेने घेत मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. यात तीन बाईक्स व एक ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली.
खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करीत असलेली एक कार व दोन महेंद्रा मॅक्सवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक विजयसिंग राठोड, सहायक मोटार वाहन निरीक्षक रविंद्र राठोड, शिवज्योती भामरे, कुणाल कुथे व गौरव तेलरांधे यांनी केली.