RSS team gave services in Vidarbha | रा.स्व. संघातर्फे विदर्भात सेवाकार्यासाठी पुढाकार

रा.स्व. संघातर्फे विदर्भात सेवाकार्यासाठी पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
योगेश पांडे
नागपूर : ‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली असल्यामुळे कष्टकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. समाजातील अशा गरजूंना विदर्भभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सहकार्याचा हात देण्यात येत आहे. विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून गरिबांपर्यंत ‘फूड किट’ वैद्यकीय सहकार्य पोहोचविण्यात येत आहे, सोबतच स्थलांतरितांच्या पोटापाण्याची सोयदेखील करण्यात येत आहे.

संकटाच्या या काळात समाजातील गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे, असे आवाहन सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले होते, तर सरसंघचालकांनीदेखील वर्षप्रतिपदेला स्वयंसेवकांना साद घातली होती. त्यानंतर तातडीने गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवकांचे नियोजन सुरू झाले. विदर्भातील सर्व मोठ्या शहरांमध्ये गरजूंपर्यंत भागनिहाय मदत पोहोचविली जात आहे. नागपुरातील ३८० झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोरोना’संदर्भात जनजागृतीदेखील सुरू आहे. या वस्त्यांमध्ये राहणाºया लोकांना उपाशी राहावे लागू नये याची काळजी घेण्यात येत आहे. सर्वांना जीवनावश्यक वस्तू व आरोग्य सेवांचा पुरवठा सुरू राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन
गरजूंना मदत पोहोचवत असताना स्वयंसेवकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले होते. विदर्भात सगळीकडेच ही बाब कटाक्षाने पाळली जात आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत मोजकेच स्वयंसेवक प्रत्यक्ष जाऊन मदत पोहोचवत असल्याची माहिती विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे यांनी दिली. नागपूर शहराला १२ नगरे आणि ३८ सेवा वस्त्यांमध्ये विभाजित करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांनी मदतसामुग्री आणि सहायता संकलन केंद्र बनवले आहेत.

दररोज हजारांहून अधिक घरी शिधावाटप

संघ स्वयंसेवकांतर्फे नागपुरात दररोज हजारांहून अधिक घरी शिधावाटप करण्यात येत आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, मजूर, कामगार, रेशनकार्ड नसणाऱ्यांचा समवेश आहे. अकोल्यामध्ये आदर्श संस्कार मंडळाच्या वतीने सेवाकार्य सुरू आहे. खामगावात तर स्वयंसेवक घरून जेवणाचे डबे तयार करून दररोज ३०० हून अधिक गरजूंकडे पोहोचवत आहेत. वर्धा, यवतमाळ, पुसद, ब्रह्मपुरी, गडचिरोली येथेदेखील शिधा गरीब लोकांच्या घरी पोहोचविल्या जात आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत सेवाकार्य सुरू आहे.

वैद्यकीय आघाडीवरदेखील पुढाकार
संघ स्वयंसेवकांतर्फे ‘कोरोना’संदर्भात जनजागृतीसाठी विशेष वैद्यकीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. यात राज्यातील ४५ हून अधिक डॉक्टर्स थेट लोकांशी संवाद साधत आहेत. शिवाय रक्तसाठ्याची कमतरता लक्षात घेता, ‘युथ फॉर सेवा’च्या माध्यमातून रक्तदान शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. शिवाय नागरिकांना ‘फेस मास्क’, ‘सॅनिटायझर’, साबणांचे वाटप करण्यात येत आहे.

 

Web Title: RSS team gave services in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.