RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक
By योगेश पांडे | Updated: March 13, 2025 21:44 IST2025-03-13T21:42:35+5:302025-03-13T21:44:42+5:30
Shankar Rao Tatwawadi: अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखांची स्थापना करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी अमेरिकेत संघ विस्तारक म्हणून कार्य केले.

RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक
-योगेश पांडे, नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक डॉ.शंकरराव तत्ववादी (९२) यांचे निधन झाले. संघाला सातासमुद्रापार नेण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीदेखील शोक प्रकट केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शंकरराव तत्ववादी यांचा निवास महाल येथील संघ मुख्यालयात होता. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पीएचडी केली होती व त्यानंतर ते तेथीलच फार्मसी विभागाचे प्रमुख झाले होते. अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखांची स्थापना करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी अमेरिकेत संघ विस्तारक म्हणून कार्य केले. ते युनायटेड किंगडममध्येदेखील प्रचारक होते.
१९९३ साली ते विश्व विभाग संयोजक झाले होते व ६० हून अधिक देशांत काम केले. त्यांच्या मार्गदर्शनातच संघाचा विविध देशांमध्ये विस्तार झाला. २०११ नंतर ते विज्ञान भारतीचे काम करत होते. संस्कृतचादेखील त्यांचा विशेष अभ्यास होता. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता संघ मुख्यालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इच्छेनुसार एम्सला देहदान करण्यात आले.
पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातून डॉ.तत्ववादी यांना श्रद्धांजली अर्पण केली. तत्ववादी हे राष्ट्र घडविण्यात व देशाच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनात त्यांनी दिलेल्या व्यापक योगदानाबद्दल कायम स्मरणात राहतील. ते नेहमीच तरुणांमध्ये जिज्ञासू भावना निर्माण करण्यास प्रोत्साहन देत असत. भारत आणि परदेशात अनेक प्रसंगी त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांची वैचारिक स्पष्टता आणि कार्यशैली नेहमीच उल्लेखनीय राहिली, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.