डॉक्टरला ५५ लाखांचा गंडा
By Admin | Updated: August 9, 2015 02:31 IST2015-08-09T02:31:01+5:302015-08-09T02:31:01+5:30
उपचाराच्या निमित्ताने ओळखी आणि नंतर मैत्री करणाऱ्या ठगबाजाने एका डॉक्टरला चक्क ५५ लाखांचा गंडा घातला.

डॉक्टरला ५५ लाखांचा गंडा
ओळखी करून फसवणूक : ठगबाज कावळे फरार
नागपूर : उपचाराच्या निमित्ताने ओळखी आणि नंतर मैत्री करणाऱ्या ठगबाजाने एका डॉक्टरला चक्क ५५ लाखांचा गंडा घातला. पंकजकुमार प्रभाकर कावळे (वय ५१) असे आरोपीचे नाव आहे. तो नानजी शास्त्रीमार्ग, खरे टाऊन, धरमपेठ येथील रहिवासी आहे.
डॉ. संजय विनायकराव कृपलानी (वय ४२) यांचे सदरमध्ये हायटेक हॉस्पिटल आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी कावळे डॉ. कृपलानी यांच्याकडे उपचारासाठी आला होता. पुढे नियमित येणे-जाणे वाढल्याने त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. आरोपी कावळेने आपण तेलाचा घाऊक व्यापार करतो, यात प्रचंड कमाई असल्याचे सांगितले. जेवढी जास्त रक्कम गुंतवली तेवढा जास्त फायदा मिळत असल्याचे सांगून डॉ. कृपलानी यांना कथित तेलाच्या व्यापाराकडे आकर्षित केले. त्यानुसार, कृपलानी यांनी आरोपी कावळेकडे ५२ लाख रुपये दिले. परंतु दोन वर्षात कावळेने त्यांना एकही रुपया लाभ दिला नाही. वेगवेगळे कारण सांगून कावळे त्यांना टाळत होता. तो बनवाबनवी करीत असल्याचा संशय आल्यामुळे कृपलानी यांनी त्याला आपली रक्कम परत मागितली. मात्र, व्यापारात मंदी आहे, तोटा झाल्याचे सांगून आरोपी कावळेने त्यांना टाळू लागला. कृपलानी यांनी सारखा तगादा लावल्यामुळे तो रक्कम परत करण्यास तयार झाला. (प्रतिनिधी)
पुन्हा हडपले तीन लाख
आपले धरमपेठमधील घर दोन कोटी रुपयात विकून तुमचे ५२ लाख रुपये परत करतो, असे कावळेने कृपलानीला सांगितले. मात्र, या घरावर किरकोळ कर्ज असून, विक्रीला काढण्यापूर्वी कर्ज आणि सर्व प्रकारचे कर चुकता करण्यासाठी कावळेने कृपलानीकडून पुन्हा तीन लाख रुपये घेतले. कावळेने गिळंकृत केलेले ५२ लाख रुपये काढण्यासाठी कृपलानीने पुन्हा त्याला तीन लाख रुपये दिले. ते घेतल्यानंतर कावळे पसार झाला. तो राहत्या घरी दिसत नसल्यामुळे आणि त्याचे सर्व संपर्क क्रमांकही बंद असल्यामुळे त्याने फसवणूक केल्याची कृपलानी यांची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी सदर पोलिसांकडे शुक्रवारी रात्री तक्रार नोंदविली.
प्रकरण गुन्हेशाखेकडे
सदरचे एपीआय सोंडे यांनी आरोपी कावळेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, प्रकरण ५५ लाख रुपयांच्या फसवणुकीचे असल्यामुळे शुक्रवारी रात्रीच ते तपासासाठी गुन्हेशाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, कावळे याने यापूर्वीही अशाच प्रकारे वेगवेगळ्या नावाने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची चर्चा आहे.