Rs 4.60 lakh ganja caught on Kamathi-Kanhan road: Three arrested | कामठी-कन्हान मार्गावर ४.६० लाखांचा गांजा पकडला : तिघांना अटक

कामठी-कन्हान मार्गावर ४.६० लाखांचा गांजा पकडला : तिघांना अटक

ठळक मुद्देकारसह ८.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : पोलिसांनी कामठी-कन्हान मार्गावरील भुयारी पुलाजवळ केलेल्या कारवाईमध्ये गांजाची वाहतूक करणारी कार पकडली. त्यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा गांजा, कार व इतर साहित्य असा एकूण ८ लाख ७५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ४.२५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मोहम्मद सादिक हबीबउर रहेमान (३८, रा. लकडगंज, कामठी), मुजाहिद कमाल अन्सारी मोहम्मद ताहीर (३४, रा. विणकर कॉलनी, कामठी) व फिरोज अख्तर मोहम्मद अल्ताफ (२०, रा. कोळसा टाल, कामठी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कामठी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना एमएच-३१/सीएन-४०७० क्रमांकाची कार कन्हानहून कामठी शहरात येत असल्याचे आढळून आले. संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी सदर कार भुयारी पुलाजवळ थांबवून कसून झडती घेतली. त्यात त्यांना तीन छोटी पोती (चुमडे) आढळून आली. तपासणीअंती त्या पोत्यांमध्ये गांजा असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी कारमधील तिघांना ताब्यात घेत अटक केली, शिवाय त्यांच्याकडून गांजासह कार जप्त केली.
या कारवाईमध्ये ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ४६ किलो गांजा, चार लाख रुपयांची कार, १२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल आणि ३,३०० रुपये रोख असा एकूण ८ लाख ७५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा गांजा कामठी शहर व परिसरात विक्रीसाठी आणला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तो नेमका कुठून आणला, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी कामठी पोलिसांनी एनडीपीएस अ‍ॅक्ट १९८५, कलम २० (ब) अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. पी. नरोटे करीत आहेत.

Web Title: Rs 4.60 lakh ganja caught on Kamathi-Kanhan road: Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.