लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 06:19 IST2025-12-11T06:19:08+5:302025-12-11T06:19:33+5:30
आ. सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडत या योजनेतील त्रुटींकडे सरकारचे लक्ष वेधले. या योजनेचे ऑडिट करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.

लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
नागपूर : लाडकी बहीण योजनेवरून बुधवारी विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांत कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. सुनील प्रभू, नाना पटोले, जयंत पाटील, भास्कर जाधव यांनी महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टोलेबाजीला सामोरे जात योजना कधीही बंद होणार नाही व ‘योग्यवेळी’ २१०० रुपये दिले जातील, असे स्पष्ट केले.
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
आ. सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडत या योजनेतील त्रुटींकडे सरकारचे लक्ष वेधले. या योजनेचे ऑडिट करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक तोंडावर असताना या योजनेची घोषणा केली व नियम न पाळता लाभ दिला गेला. त्यामुळे गुन्हे आता बोगस लाभार्थ्यांवर दाखल करावे की सरकारवर असा सवाल नाना पटोले यांनी केला. तर अर्जांची पडताळणी न करता मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. भास्कर जाधव यांनी तर सरकार निवडणुकीसाठी घोषणा करून फसवणूक केल्याचे सांगत सभात्याग केला. महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेअंतर्गत आतापर्यंत देण्यात आलेल्या लाभाचा आढावा मांडला. ही योजना बदनाम करण्यासाठी काहीही विषय काढू नका, अशी विनंती त्यांनी केली. पण, विरोधकांनी त्यांची कोंडी करण्यासाठी कुठलीच कमी ठेवली नाही.
शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुरा सांभाळली. ते म्हणाले, ही योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा माणूस कोर्टात गेला. तरीही आम्ही योजना राबवून पैसे दिले. लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी केला. ज्यांनी खोडा घातला त्यांना जोडा दाखविला. आता तरी विरोधात बोलू नका, नाहीतर पुन्हा आगामी निवडणुकीत लाडक्या बहिणी धडा शिकवतील, असा इशारा देत ही योजना कधीही बंद होणार नाही व ‘योग्यवेळी’ एकवीसशे रुपये दिले जातील, असे त्यांनी जाहीर केले.
लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांकडून दोन महिन्यांत वसुली
अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अशा ज्या कुणी सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत त्यांच्याकडून वसुली केली जाईल, असे महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. १२ हजार पुरुषांची लाभार्थींची नावे समोर आली आहेत. त्यांची पडताळणी सुरू आहे. मात्र, बऱ्याच महिलांनी सुरुवातीला त्यांच्या नावाने बँक खाते नसल्यामुळे घरातील पुरुषांचे बँक खाते दिले. त्यांची नावे कपात केली जाणार नाहीत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.