आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' १० महिन्यात ९५८ मुले पोहचली कुटुंबियांत
By नरेश डोंगरे | Updated: February 8, 2024 20:23 IST2024-02-08T20:23:09+5:302024-02-08T20:23:28+5:30
रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले.

आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' १० महिन्यात ९५८ मुले पोहचली कुटुंबियांत
नागपूर : रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले. आरपीएफकडे मुख्यत्वे रेल्वेची मालमत्ता सुरक्षित राखण्याची आणि रेल्वे प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी असते. हे करतानाच आरपीएफ वेगवेगळ्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडते. प्रसंगी जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवाशांचे जीवही वाचविते.
शिवाय वेगवेगळ्या कारणामुळे घर सोडून निघालेल्या अल्पवयीन मुलांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचविण्याचे कामही आरपीएफचे जवान करतात. अनेकदा कुणी आमिष दाखवून तर कुणी फूस लावून अल्पवयीन मुला-मुलींना पळवून नेतात. काही जण रागाच्या भरात घर सोडतात तर काही जण मनासारखे जगण्याच्या हेतूने घरापासून दूर पळून स्वत:चे भवितव्य अंधारात झोकण्याचा धोका पत्करतात. अशा सर्व अल्पवयीन मुला-मुलींना अलगद हेरून आरपीएफ त्यांना ताब्यात घेते आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने त्यांचे योग्य समुपदेशन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांमध्ये पोहचविते.
एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या १० महिन्यांच्या कालावधीत अशाच प्रकारे आरपीएफने मध्य रेल्वेच्या पाच विभागातील एकूण ९५८ मुलांना ताब्यात घेतले आणि त्यांना त्यांच्या घरी पोहचवून त्यांचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित केले आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा दिला. या महत्वपूर्ण कामगिरीत आरपीएफला रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि फ्रंट लाईन रेल्वे कर्मचाऱ्यांनीही मदत केली.
मुलांची संख्या दुप्पटपेक्षा जास्त
विशषे म्हणजे, आरपीएफने अवघ्या एका महिन्यात अर्थात जानेवारी २०२४ मध्ये ५६ मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे. घरून पळून जाणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ९५८ मुला-मुलींमध्ये ६५५ मुले तर ३०३ मुलींचा समावेश आहे.
विभागनिहाय ताब्यात घेण्यात आलेली मुले
मुंबई विभाग : १७५ मुले, ११४ मुली, एकूण २८९
नागपूर विभाग : ७६ मुले, ५६ मुली, एकूण १३२
भुसावळ विभाग :१६९ मुले, १०१ मुली, एकूण २७०
पुणे विभाग : १९८ मुले, ८ मुली, एकूण २०६
सोलापूर विभाग : ३७ मुले, २४ मुली, एकूण ६१