भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST2021-01-16T04:10:55+5:302021-01-16T04:10:55+5:30
ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) येथे बुधवारी आठवडी व राेज गुजरी बाजार भरताे. या ...

भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांची लूट
ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) येथे बुधवारी आठवडी व राेज गुजरी बाजार भरताे. या बाजारांमध्ये स्थानिक व परिसरातील शेतकरी भाजीपाला विकायला आणतात. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या बाजारात बाजार चिठ्ठी वसूल करण्याचे कंत्राट दिले आहे. कंत्राटदार बाजारचिठ्ठीच्या नावाखाली आठवडी व गुजरी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांकडून मनमानी रक्कम पावती न देता वसूल करताे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट हाेत असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
किमान २० हजार लाेकसंख्या असलेले काेंढाळी हे गाव काटाेल तालुक्यातील माेठ्या व महत्त्वाच्या गावांपैकी एक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर असल्याने या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील बाजारचिठ्ठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने वसूल केली जात असून, ग्रामपंचायत दरवर्षी बाजारचिठ्ठी वसूल करण्याचे कंत्राट देते. या बाजारात स्थानिक व परिसरातील गावांमधील अनेक शेतकरी त्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला विकायला आणतात. शिवाय, शेकडाे नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असल्याने येथील भाजीपाला बाजारातील आर्थिक उलाढाल माेठी आहे. बाजारचिठ्ठीच्या रूपाने ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्नही मिळते.
ग्रामपंचायत प्रशासनाने बाजारचिठ्ठीचे काेणते दर व नियम ठरवून दिले आहेत, याबाबत कुणालाही माहिती नाही. या दर व नियमांचा फलक ग्रामपंचायत कार्यालय अथवा आठवडी बाजारात दर्शनी ठिकाणी लावलेला नाही. काेराेना संक्रमण काळात आठवडी बाजारांवर बंदी घातली हाेती. त्या काळात काेंढाळी येथे राेज गुजरी बाजार भरायचा. त्या काळातही कंत्राटदाराने भाजीपाला विक्रेत्यांकडून बाजारचिठ्ठीची बळजबरीने वसुली केली. जाे भाग काेंढाळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नाही, तेथील गुजरी बाजारातही हा कंत्राटदार बाजारचिठ्ठी वसूल करताे. त्याने बाजारचिठ्ठीच्या वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना नियुक्त केले आहे.
कित्येक वर्षांपासून एकच कंत्राटदार
बाजारचिठ्ठीचे कंत्राट देताना ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी वृत्तपत्रात निविदा अथवा जाहीरनामा प्रकाशित न करता दिले जाते. कित्येक वर्षांपासून एकाच व्यक्तीला बाजारचिठ्ठी वसूल करण्याचे कंत्राट दिले जात आहे. त्यामुळे या व्यवहारातील पारदर्शकतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कंत्राटदार भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ५० ते ६० रुपये वसूल करताे. रक्कम घेतल्यानंतर त्याची पावतीही देत नाही. रक्कम देण्यास नकार दिल्यास अथवा पावती मागितल्यास कंत्राटदार विक्रेत्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीही करताे. हा प्रकार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहिती असूनही सर्वजण गप्प राहण्यात धन्यता मानत आहेत.
....
नियमबाह्य बाजारचिठ्ठी
काेंढाळी परिसरात काटाेल व कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) या नगर परिषदेच्या हद्दीतही गुजरी व आठवडी बाजार भरताे. या दाेन्ही बाजारांमध्ये छाेट्या, गरीब व शेतकरी भाजीपाला विक्रेत्यांना बाजारचिठ्ठीतून सूट देण्यात आली आहे. शिवाय, त्या शहरांमध्ये दुकानाच्या किंवा ओट्याच्या आकारानुसार बाजारचिठ्ठी वसूल केली जाते. येथील बाजारचिठ्ठी ही ३० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशी माहिती काही भाजीपाला विक्रेत्यांनी दिली.