छिंदवाड्याच्या तुरुंगातून पळालेल्या दरोडेखोरांना नागपुरात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 09:30 PM2019-08-07T21:30:14+5:302019-08-07T21:31:44+5:30

छिंदवाडा येथील पोलीस ठाण्यातील तुरुंग तोडून आणि पोलिसांना जखमी करून फरार झालेल्या आंतरराज्यीय दरोडेखोराच्या टोळीतील तीन सदस्यांना नागपुरात कळमना पोलिसांनी अटक केली.

The robbers who escaped from Chhindwada jail were arrested in Nagpur | छिंदवाड्याच्या तुरुंगातून पळालेल्या दरोडेखोरांना नागपुरात अटक

छिंदवाड्याच्या तुरुंगातून पळालेल्या दरोडेखोरांना नागपुरात अटक

Next
ठळक मुद्देआंतरराज्यीय टोळीचे सदस्य : कळमना पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छिंदवाडा येथील पोलीस ठाण्यातील तुरुंग तोडून आणि पोलिसांना जखमी करून फरार झालेल्या आंतरराज्यीय दरोडेखोराच्या टोळीतील तीन सदस्यांना नागपुरात कळमना पोलिसांनी अटक केली.
बुधवारी सकाळी एका जागरूक नागरिकाने दिलेल्या सूचनेच्या आधारावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कळमना परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मोनू भुरमल ठाकूर (२५) , राजकुमार हेता केराम (२५) रा. नैनपूर मंडला आणि रवि रामप्रसाद दुबे (३०) रा. बेला राममंदिरजवळ भंडारा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे.
छिंदवाडा पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीच्या आघ सदस्यांना यापूर्वीच पकडले आहे. या टोळीने घंसौर (सिवनी) च्या एसडीओपी श्रद्धा सोनकर यांच्या शासकीय निवासस्थानातून पिस्तुल चोरले होते. सिवनी येथील एका पोलीस शिपायाच्या घरातून गणवेश चोरला होता. त्यांनी २५ जुलै रोजी उमरियातील फकिरा पाठेच्या घरावर हल्ला करून लुटमार केली होती. दरम्यान प्रतिकार केल्यामुळे पाठेची हत्या केली होती. या हल्ल्यात पाठेची पत्नी आणि इतर कुटुंबीय जखमी झाले होते. ही टोळी एटीएम फोडणे, दरोडा आणि लुटमार करीत असते. या टोळीने छिंदवाडा पोलिसांवर गोळीबार सुद्धा केला होता. परंतु पोलिसांनीही प्रत्युत्तर देत या टोळीतील सदस्यांना पकडले होेते. त्यांच्याजवळून पिस्तुल, काडतुस, कार, बाईक आणि दागिन्यांसह लाखो रुपये जप्त करण्यात आले होते. त्या सर्वांना छिंदवाड्याजवळील उमरानाला चौकीतील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.
मंगळवारी रात्री दरोडेखेरांनी पोलीस कोठडीतून पळून जाण्याची योजना आखली. टोळीचा मुख्य सूत्रधार रमेश ठाकूरने शौचालयाला जाण्याचा बहाणा केला. त्याने शौचालयात पाणी नसल्याचे सांगत पोलीस शिपाई रमण यांस पाणी आणण्यासाठी पाठवले. रमण पाणी घेऊन परत येताच त्याच्यवर सर्वजण तुटून पडले. त्याला जखमी करून कोठडीत बंद करून पळू लागले. आरडाओरड एकूण इतर पोलीसही चौकीत पोहोचले. परंतु या दरोडेखोरांनी त्यांनाही जखमी केले आणि फरार झाले. तुरुंगातून पळाल्यावर सर्वजण वेगवेगळ्या दिशेने पळाले. अटक करण्यात आलेला आरोपी रवि दुबेचा भाऊ कळमन्यातील जय अंबे नगरात राहतो. रविच्या भावाकडे आश्रय घेण्याठी रविसोबत मोनू व राजकुमारही ट्रकने नागपूरला पोहोचले.
बुधवारी सकाळी ७ वाजता तिघेही जय अंबेनगरात पोहोचले. रवीने आपल्या भावाला आपबिती सांगितली. तेव्हा त्याच्या भावाने घरी आश्रय देण्यास नकार दिला. पोलिसांना सूचना देण्याचाही इशारा दिला. हे ऐकून रवीचे साथीदार पळाले. याच वेळी वस्तीतील लोकही गोळा झाले. त्यांनी रवीला चोर समजून पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. कळमना पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रवी दुबेला पकडले. दरम्यान छिंदवाडा पोलिसांनी नागपूर पोलिसांना दरोडेखोर तुरुंगातून पळाल्याची माहिती दिली होती. या माहितीमुळे कळमना पोलिसांना रवीवर संशय आला. त्यांनी कडक विचारपूस केली असता, आपल्या दोन इतर साथीदारांचीही माहिती दिली. पोलिसांनी घेराबंदी करून त्यांनाही अटक केली. कळमना पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मिळताच छिंदवाडा पोलिसही नागपूरला पोहोचले. आरोपी त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
या टोळीचा मूख्य सूत्रधार रमेश ठाकूर, देवा ऊर्फ देवराज वर्मा आणि गोलू ऊर्फ श्रावण खापरे आहे. तिघेही त्यांचे साथीदार बोरा ठाकूर, चेतन गायधनेसह फरार आहेत. छिंदवाड्याचे पोलीस अधीक्षक मनोज राय यांनी कळमना पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे.
ही कारवाई उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विश्वनाथ चव्हाण, पीएसआय अमित कुमार आत्राम, पोलीस दशरथ मिश्रा, अमित तुमसरे, नरेंद्र तिडके, दिलीप जाधव, प्रशांत गभणे, प्रफुल्ल ढवळे, दुर्गेश माकडे, संदीप बोरकर, शरद राघोर्ते, पवन पिट्टलवार, अशोक तायडे यांनी केली.
या टोळीची बुटीबोरी-हुडकेश्वरमध्येही दहशत
या टोळीला नागपूर शहर आणि ग्रामीण भागाची चांगली माहिती आहे. त्यांनी बुटीबोरी, हुडकेश्वरसह अनेक ठिकाणी एटीएम फोडणे, लुटमार आणि अनेक मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. बुटीबोरी आणि हुडकेश्वर येथील पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत. दुबे हा नागपुरात एखादी मोठी चोरी करण्याच्या उद्देशानेच आल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत कळमना पोलीस छिंदवाडा पोलिसांशी संपर्क करणार आहे. इतर फरार आरोपींचाही येथे शोध घेतला जात आहे.

Web Title: The robbers who escaped from Chhindwada jail were arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.