वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 13:59 IST2016-06-20T13:56:12+5:302016-06-20T13:59:04+5:30
अमरावती महामार्गावर वाहन चालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या बांधण्यात हिंगणा पोलिसांनी यश मिळवले.

वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० - अमरावती महामार्गावर वाहन चालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या बांधण्यात हिंगणा पोलिसांनी यश मिळवले. दीपक गिरी (२७, रा. धामना), सौरभ वाकडे (१९, रा. धामना), भागवत सलाम (२५, रा. धामना), पंकज ठाकरे (२८, रा. व्याहाडपेठ), मंगेश कोरडे (२७, रा. चौदा मैल) अशी या लुटमार करणा-या टोळीतील आरोपीची नावे आहेत. त्यातील दीपक गिरी हा मेटाडोर चालक आहे.
शनिवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास मनोज पटेल (वय २८, रा. सुरेंद्रगड) हा टाटा झिप आॅटो घेऊन अमरावतीला जात होता. सावज शोधत असलेल्यां दीपक गिरी आणि साथीदारांना तो दिसताच त्यांनी त्याला लुटण्याची योजना बनविली. ठरल्यानुसार, पाठलाग करून धामना गावाजवळ गिरीने त्याला मेटाडोरचा कट मारला. धोका लक्षात घेत पटेलने आपला आॅटो कसा बसा पुढे दामटला. त्याच्या सोबत वर्तमानपत्र घेऊन जाणाऱ्या एका बोलेरोच्या चालकानेही आपले वाहन दामटले. काही अंतरावर आॅटोचालक व बोलेरोचालक लघुशंकेसाठी थांबले.
त्यांच्या मागे लगेच आरोपी गिरी मेटाडोर घेऊन आणि त्याचे साथीदार मोटरसायकलवर बसून आले. त्यांनी आॅटो तसेच बोलेरो चालकावर हल्ला चढवला. गाडीची काच फोडली. बोलेरोचालकाच्या खिशातील १४०० रुपये व मोबाईल हिसकावून घेतला. संधी साधून बोलेरो चालक आमीर खान (रा. कामठी) वाहन सोडून पळून गेला. मात्र, आॅटोचालक मनोज पटेल पळू शकला नाही.
रॉड डोक्यावर बसल्याने तो भोवळ येऊन खाली पडला. लुटमार केल्यानंतर आरोपी पळून गेले. त्यानंतर शुद्धीवर आलेल्या पटेलने हिंगणा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. हिंगणा पोलिसांनी पटेल तसेच बोलेरो चालकाचा उपचार करून आरोपीचा शोध सुरु केला. ठाणेदार हेमंत खराबे आणि त्यांच्या सहका-यांनी तातडीने धावपळ करून आरोपींना रविवारी धामना गावात पकडले. त्यांची दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांनी रात्री या गुन्ह्याची कबुली दिली. वृत्त लिहिस्तोवर त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा पीसीआर मिळवण्याचा पोलिस प्रयत्न करीत होते.