नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा रस्त्यांना ७० कोटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:33 IST2020-09-22T21:32:16+5:302020-09-22T21:33:28+5:30
नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्यातील रस्त्यांना व पुलांना बसला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ७० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा रस्त्यांना ७० कोटीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्यातील रस्त्यांना व पुलांना बसला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ७० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगलाच बरसला आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. जवळपास ३० हजार हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले. पुरामुळे ६१ गावे बाधित झाली असून, त्यात २८,१०४ नागरिकांचे नुकसान झाले. पुरामुळे १,६०२ जनावरे मृत्यू पावले तर ७,७६५ घरांची पडझड झाली. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांनाही चांगलेच झोडपून काढले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांचा आढावा घेतला असता, जिल्ह्यातील २८० रस्त्यांची ५६९.२२ किलोमीटरची वाट लागली. मोऱ्या (पूल) १०६ क्षतिग्रस्त झाले. नागपूर तालुक्यातील ८३ किलोमीटरचे रस्ते खराब झाले. तर भिवापूर तालुक्यातील २२ पूल क्षतिग्रस्त झाले. पारशिवनी तालुक्यातील एक पुल पुरामुळे चक्क वाहूनगेला. त्यामुळे अजूनही या रस्त्यावरील आवागमन थांबले आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून बांधकाम विभागाने दुरुस्तीसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.