लासलगाव परिसरात रस्ते निर्मनुष्य....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 23:30 IST2020-03-22T23:29:59+5:302020-03-22T23:30:59+5:30
लासलगाव : एरव्ही कांदा विक्र ीसाठी सकाळी गजबजणारी बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यांसह लहान रस्त्यांवरदेखील एकही मनुष्य दिसत नसल्याने कोरोनामुळे लासलगावी जनता कर्फ्यू सुरू झाला आहे.

लासलगाव परिसरात रस्ते निर्मनुष्य....
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : एरव्ही कांदा विक्र ीसाठी सकाळी गजबजणारी बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यांसह लहान रस्त्यांवरदेखील एकही मनुष्य दिसत नसल्याने कोरोनामुळे लासलगावी जनता कर्फ्यू सुरू झाला आहे.
रविवारी सकाळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी भल्या पहाटे लोकांना वर्तमानपत्रे वितरित केली. तसेच दूध विक्री करणारे विक्रेते यांनी शनिवारी रात्री व रविवारी सकाळी लवकर दूध वितरित केले. लासलगाव बसस्थानकावरदेखील शुकशुकाट होता. लासलगाव रेल्वेस्थानकदेखील निर्मनुष्य झाले आहे.
केवळ पोलीस, मीडिया प्रतिनिधी, डॉक्टर, सफाई कर्मचारी याखेरीज कोणीही बाहेर पडू नका, अन्यथा संबंधितांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात येईल तसेच कोणीही बंद आहे की नाही हेसुद्धा पाहण्यासाठी घराबाहेर पडू नये. सर्वांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शनिवारपासून विविध सोशल मीडियावर लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी केले होते. लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी रविवारी सकाळपासून एकही बस आगाराबाहेर न गेल्याने पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे असे सांगितले. लासलगाव रेल्वेस्थानकावरदेखील चिटपाखरूही नव्हते.
लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सोनवणे, राजेंद्र पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गस्त सुरू होती.