सिव्हिल लाईन भागातील रस्त्यांची दुरुस्ती
By Admin | Updated: November 23, 2015 02:38 IST2015-11-23T02:38:18+5:302015-11-23T02:38:18+5:30
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्तान मंत्री व अधिकाऱ्यांचे वास्तव्य असणाऱ्या सिव्हिल लाईन भागातील रस्ते दुरुस्तीची कामे जोरात सुरू आहेत.

सिव्हिल लाईन भागातील रस्त्यांची दुरुस्ती
अधिवेशनाची तयारी : शासकीय कार्यालये फाईल्स पूर्ण करण्यात व्यस्त
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्तान मंत्री व अधिकाऱ्यांचे वास्तव्य असणाऱ्या सिव्हिल लाईन भागातील रस्ते दुरुस्तीची कामे जोरात सुरू आहेत. ज्या मार्गावरुन मंत्री व अधिकारी ये-जा करणार आहेत त्याच रस्त्यांचे प्रामुख्याने डांबरीकरण व दुरुस्ती केली जात आहे.
अधिवेशनाच्या तीन आठवड्यांच्या कालावधीत सरकारचा कारभार उपराजधानीतून चालणार आहे. त्यामुळे मंत्री व अधिकाऱ्यांच्या स्वागतात कोणत्याही स्वरूपाची कमतरता राहू नये, यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. चिटणीस पार्क परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. काही मार्गांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. गिट्टी निघलेल्या रस्त्यांच्या कडेची डागडुजी सुरू आहे.
शहरातील रस्त्यांवर गड्डे पडले आहेत. परंतु महापालिकेची बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेता सर्वच रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण करणे शक्य नाही. अधिवेशनानंतर टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
स्थायी समितीने शहरातील उखडलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. उपलब्ध निधीनुसार ही कामे हाती घेतली जाणार आहेत. एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी निधी नाही. दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी वित्त विभागाला मागील काही महिन्यांपासून आर्थिक बचत करावी लागली होती. ही बचत केली नसती तर कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणे शक्य नव्हते. (प्रतिनिधी)