रस्त्यांवरील गतिराेधक देताहेत अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:49+5:302021-04-09T04:08:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : शहराला जाेडणाऱ्या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. यामुळे वाहनचालकांसह शहरवासीयांना माेठा ...

Road bumps invite accidents | रस्त्यांवरील गतिराेधक देताहेत अपघाताला आमंत्रण

रस्त्यांवरील गतिराेधक देताहेत अपघाताला आमंत्रण

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : शहराला जाेडणाऱ्या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. यामुळे वाहनचालकांसह शहरवासीयांना माेठा दिलासा मिळाला. परंतु मुख्य मार्गासह इतर रस्त्यांवर चुरीमिश्रित डांबरीकरणाने उभारलेले गतिराेधक सध्या अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. विशेषत: रात्रीच्या सुमारास अंधारात हे गतिराेधक वाहनचालकांना दिसत नसल्याने याठिकाणी वाहने उसळून अपघाताची शक्यता बळावली आहे.

गेल्या आठवड्यात शहरातील मुख्य मार्गावर काही ठिकाणी चुरीमिश्रित डांबरीकरणाचे डबल गतिराेधक तयार करण्यात आले. जुने पंचायत समिती, अवधूत कॉलेज, आजनी-नवेगाव-इसापूर, वडोदा रोड ते कुंभारपुरा मार्ग, पांडेगाव-कुही मार्ग व खरबी-खोबना-कुही मार्ग आदी रस्त्यांवर नव्याने डबल गतिराेधक तयार केले गेले. रस्त्यावर गतिराेधक तयार करण्यास कुणाचाही विराेध नाही. परंतु चुकीच्या ठिकाणी, उंच व ओबडधाेबड पद्धतीने तयार केलेले डबल गतिराेधक वाहनचालकांसाठी डाेकेदुखी ठरत आहेत.

नागरिकांची मागणी लक्षात घेता शहरातील बहुतांश रस्त्यांवर प्रशासनातर्फे गतिराेधक तयार केले असावे, असा अनेकांचा समज हाेता. परंतु या गतिराेधकांबाबत नगर पंचायत प्रशासनाकडे कुठलीही माहिती नाही अथवा कल्पनादेखील नाही. त्यामुळे हे गतिराेधक तयार केले कुणी, हे कळायला मार्ग नाही. संबंधित कंत्राटदाराने अतिशय ओबडधाेबड तयार केलेले गतिराेधक रात्रीच्या अंधारात दिसत नाही. शिवाय काही ठिकाणी गतिराेधक चुकीच्या ठिकाणी तयार केले. यासाठी कुणी परवानगी दिली, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे. अपघाताला आमंत्रण देणारे हे गतिराेधक काढून याेग्य ठिकाणी, वाहनचालकांना त्रास हाेणार नाही, असे गतिराेधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Road bumps invite accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.