धोका कायम; दक्षतेची गरज!
By Admin | Updated: May 21, 2015 02:37 IST2015-05-21T02:37:51+5:302015-05-21T02:37:51+5:30
दोन वेळा झालेल्या घातपातांच्या घटना आणि ठिकठिकाणच्या घातपातांमध्ये कनेक्शन दिसूनही सुरक्षा यंत्रणा धडा घ्यायला ...

धोका कायम; दक्षतेची गरज!
नरेश डोंगरे नागपूर
दोन वेळा झालेल्या घातपातांच्या घटना आणि ठिकठिकाणच्या घातपातांमध्ये कनेक्शन दिसूनही सुरक्षा यंत्रणा धडा घ्यायला तयार नसल्यामुळे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेली उपराजधानी अस्वस्थ आहे. ठिकठिकाणच्या दहशतवाद्यांचे आणि नक्षलवाद्यांचे सारखे येणे-जाणे, त्यांच्या स्लीपर्सच्या संशयास्पद हालचाली आणि बांगलादेशी घुसखोरांची वर्दळ तसेच सुरक्षा यंत्रणांचा ढिम्मपणा या अस्वस्थतेमागचे मुख्य कारण आहे. उपराजधानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. येथे (अन् विदर्भात कुठेही!) कोणत्याही दिवशी दहशतवादी घात करू शकतात. यापूर्वी तसे प्रयत्नही झाले आहेत.नागपूरच नव्हे तर, विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया वगळता सर्वच जिल्ह्यात दहशतवादी संघटनांचे स्लिपर सक्रिय झाल्याचा अहवाल काही महिन्यांपूर्वी आला होता. नागपूर शहरासह कामठी, कन्हान, काटोल, हिंगणघाट (वर्धा), चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, पातूर हे तालुके फारच संवेदनशील झाल्याची कुजबूज वाढली आहे. येथील संशयास्पद हालचाली मोठ्या धोक्याचे संकेत देत आहेत. यामुळे एटीएससह स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी अधिक सक्रिय होण्याची गरज विशद केली जात आहे. मात्र, चित्र उलट आहे.
ंपोलीस ‘लोड नही लेने का’ या भूमिकांमध्ये दिसतात तर एटीएसच्या स्थानिक युनिटची स्थिती दयनीय आहे. आठ वर्षांपूर्वी संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर नागपुरात एटीएसचे युनिट देण्यात आले. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्र्यांसोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या युनिटला एसीपी दर्जाचा एक अधिकारी, अर्धा डझन पीआय-पीएसआय आणि चार-पाच डझन कर्मचारी देण्याचे सूतोवाच केले होते.
मात्र, या घोषणेची अद्याप पूर्तता झाली नाही. या युनिटला एसीपी तर सोडा, भरपूर मनुष्यबळ अद्यापपर्यंत मिळालेच नाही. उलट चार वर्षांपूर्वी नागपूर युनिटचे विभाजन करून अर्धे मनुष्यबळ अकोल्याला स्थानांतरित करण्यात आले.
फटका बसण्याचा धोका
विदर्भातील नागपूर आणि अकोला युनिटमध्ये एकूण ७ अधिकारी आणि ५० कर्मचाऱ्यांचे संख्याबळ आहे. त्यांच्यावर ११ जिल्ह्यातील हजारो गावांवर नजर ठेवण्याची, दहशतवादी संघटनांच्या स्लिपर्सच्या हालचाली अधोरेखित करण्याची जबाबदारी आहे. ५०-६० जणांचे संख्याबळ एवढ्या मोठ्या विदर्भावर कशी नजर ठेवत असतील, त्याची कल्पनाच केलेली बरी. तोकडे संख्याबळ अन् विस्तारलेल्या क्षेत्रासोबतच परप्रांतीयांचे रोज येणारे लोंढे थोपविण्याचे आव्हान असताना हे युनिट स्वत:शीच एकाकी झुंज देत असल्याचे वास्तव आहे.
सध्या येथील युनिटचे एसपी औरंगाबादला बसतात. डीआयजी पुण्यात आणि डीजी मुंबईत बसतात. छोट्या छोट्या गोष्टीसाठी एसपी ते डीजींकडे परवानगी घेण्यात वेळ खर्ची होतो. त्यामुळे तातडीने आॅपरेशन करण्याची वेळ आल्यास मोठा फटका बसू शकतो.
नागपुरात एसपी (अधीक्षक) बसले तर स्थानिक अधिकाऱ्यांना ‘आॅपरेशन’ करण्यासाठी सोयीचे होईल. दहशतवादी आणि त्यांच्या स्लिपर सेलप्रमाणेच गडचिरोली, गोंदियातून पुन्या मुंबईपर्यंत हापाय पसरणा-या नक्षल्यांचीही खबरबात ठेवणे आॅपरेशन करणे शक्य होईल.
दहशतवाद घटना अन् कनेक्शन
संघ मुख्यालयावर हल्ला, मशिदीजवळ सापडले होते पाईप बॉम्ब, पुन्हा संघ मुख्यालय, रेल्वेस्थानक हिटलिस्टवर. तीन वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीचे नागपूर कनेक्शन. तत्पूर्वी गुजरातमध्ये आणि आंध्रप्रदेशात (हैदराबाद) झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील स्फोटके नागपुरातून गेल्याचे उघड. या पार्श्वभूमीवर उपराजधानीत अनेक पाकिस्तानी तसेच बांगलादेशी अनधिकृत वास्तव्याला आहेत. उपराजधानीत गेल्या दहा वर्षात कोट्यवधींच्या बनावट नोटा चलनात आणताना पकडले गेलेल्या आरोपींपैकी ७५ टक्के आरोपी बांगलादेशी आहेत.
अनेकांना नागपुरात अटक
देशाला हादरवून सोडणाऱ्या मुंबई लोकल ट्रेन स्फोटाच्या मालिकेतील मास्टर मार्इंड डॉ. अब्रार आरिफ नागपूरचा. त्याला त्याच्या साथीदारांसह अटक. दिल्लीतील बटाला हाऊस चकमकीतील आरोपीचा साथीदार, आमिर ताल्हाह यालाही स्थानिक एटीएसने जेरबंद केले. तीन महिन्यांपूर्वी पांढुर्ण्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके बाळगणारे ब्लास्टर स्थानिक एटीएस युनिटकडून जेरबंद. दहशतवादी संघटनांशी जुळलेले अनेक जण नागपुरात आले, मुक्कामी थांबले, येथून पळून गेल्याचे वेळोवेळी खुलासे.
संवेदनशील स्थळे
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर केवळ संघ मुख्यालय आणि रेल्वेस्थानक असल्याची गुप्तचर यंत्रणांनी माहिती जाहीर केली आहे. मात्र, केवळ ही दोनच स्थळे नाहीत तर दीक्षाभूमी, बाबा ताजुद्दीन दर्गाह, विधानभवन, रिझर्व्ह बँक, रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक, बाजारपेठ, मोठे हॉटेल्स, मॉल आणि शैक्षणिक संस्था.