नोटांसाठी दाही दिशा !

By Admin | Updated: November 16, 2016 02:29 IST2016-11-16T02:29:46+5:302016-11-16T02:29:46+5:30

५०० आणि १०००च्या चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला मनाई केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर संकटात आले आहेत.

Right direction for notes! | नोटांसाठी दाही दिशा !

नोटांसाठी दाही दिशा !

शेतकरी संकटात : जिल्हा बँकेची कोंडी : पतसंस्थाही अडचणीत
५०० आणि १०००च्या चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला मनाई केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर संकटात आले आहेत. या आदेशामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. घरातील जुन्या नोटा कुठे ठेवायच्या, हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. इकडे पतसंस्थांमध्ये ‘चलनकोंडी’ करण्यात आल्याने नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील १००७ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत.

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कोलमडणार
मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूर
जिल्हा बँकेला ५०० व १००० हजार रुपये न स्वीकारण्याच्या आदेशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. घरातील जुन्या नोटा कुठे ठेवायच्या, हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये जुन्या नोटांचे व्यवहार बंद झाल्यामुळे शेतकरी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत आहेत. हा निर्णय परत न घेतल्यास शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडणार आहे. या संदर्भात खुद्द पंतप्रधानांनी लक्ष घालून निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

६०%शेतकरी जिल्हा बँकेचे सभासद
एकूण लोकसंख्यपैकी ६० टक्के शेतकरी गावात राहतात. ते जिल्हा बँकेचे सभासद आहेत. गावागावांमध्ये अजूनही राष्ट्रीयकृत बँकांच्या पुरेशा शाखा नाहीत. त्यांच्यासमोर जिल्हा बँकेशिवाय दुसरा पर्याय नाही. खत खरेदी वा मजुराला पैसे देण्याचा व्यवहार शेतकरी रोखीने करतो. दुसरीकडे राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांमध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत. या बँकांमध्ये शेतकऱ्यांचे खाते नसल्यामुळे ते त्या बँकांमध्ये जात नाहीत. सरकारने रक्कम भरण्यास आणि काढण्यास ३० डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यामुळे त्यांनी पैसे भरण्यास घाई केली नाही. दुसरी बाजू पाहिल्यास जिल्हा बँकेत मोठ्या लोकांचे खाते नाहीत. शेतकऱ्यांसमोर दुसऱ्या बँकेचा पर्याय नसल्यामुळे तो अडचणीत सापडला असून चिंताग्रस्त आहे. जुना नोटा स्वीकारण्यास मनाई करणारा आदेश रिझर्व्ह बँकेने मागे घ्यावा, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

जुन्या नोटांनी कर्ज
कसे भरणार?
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने मंगळवारीपासून जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. सकाळपासून अनेक शेतकरी परत गेल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेत ८५८ कोटींच्या ठेवी असून ६५७ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. सोमवारपर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास दोन कोटींचे कर्ज भरले आणि १० कोटी जुन्या नोटांचा भरणा केला. पण मनाई आदेशामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पण शेतकऱ्यांना मार्चपर्यंत बिनाव्याजी कर्ज भरण्याची मुदत आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज भरता येईल, अशी माहिती बँकेचे अधिकारी सतीश निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली.

शेतकरी चिंताग्रस्त
रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळे शेतकरी व शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्याच्या घरी क्षमतेनुसार ३० ते ५० हजारांपर्यंत रक्कम असते. शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन विकले आहेत. त्यांच्याकडे रोख रक्कम आहे. त्या रकमेचे काय करायचे, हा मोठा प्रश्न आहे. सरकारचा निर्णय चुकीचा आहे. रब्बी हंगाम सुरू आहे. मजुराला देण्यासाठी त्यांच्याकडे नव्या नोटा नाहीत. त्यामुळे मजुरांनीही कामाकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी शेती बुडण्याची भीती निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आदेशाचा फटका बसला आहे.
- डॉ.बबनराव तायवाडे
प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस

Web Title: Right direction for notes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.