तांदूळ देतोय महागाईचा झटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:39+5:302021-01-13T04:17:39+5:30
नागपूर : जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडल्यानंतर यंदाच्या हंगामात तांदळाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या तांदळाच्या किमती ...

तांदूळ देतोय महागाईचा झटका!
नागपूर : जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडल्यानंतर यंदाच्या हंगामात तांदळाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या तांदळाच्या किमती दर्जानुसार ६ ते १० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. हंगामात धानाचे उत्पादन कमी झाले असून उतारीही कमी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी उपलब्धता तसेच निर्यात वाढल्याने तांदळाच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
तांदळाच्या किमतीत दीड महिन्यापासून वाढत आहे. सर्वाधिक तेजी चिन्नोर आणि जय श्रीराम तांदळात आली आहे. गेल्या वर्षी चिन्नोर किरकोळमध्ये ४४ ते ४६ रुपये किलो होता, तो आता ५५ ते ५७ रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय विदर्भातील भंडारा, ब्रह्मपुरी आणि नागभीड येथील जय श्रीराम तांदूळ ६ ते ८ रुपयांनी वाढून दर्जानुसार ४५ ते ५२ रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय आंध्रप्रदेश आणि कर्नाटकचा जय श्रीराम ३८ ते ४२ रुपयांवर गेला आहे. याशिवाय किरकोळमध्ये बीपीटी ३२ ते ३५, एचएमटी ३७ ते ४०, नवीन सुवर्णा २४ ते २६ आणि कर्नाटक तांदूळ ४१ ते ४३ रुपयांवर गेला आहे. या तांदळात ४ ते ६ रुपयांची तेजी आल्याचे कळमन्यातील न्यू ग्रेन मार्केटमधील व्यापारी रमेश उमाठे यांनी सांगितले.
पावसामुळे पिकांचे नुकसान
पीक काढणीला असतानाच झालेली गारपीट आणि मुसळधार पावसामुळे सर्वच राज्यात धान पिकाचे जवळपास ३० टक्के नुकसान झाले आहेत. त्यामुळे भाववाढ झाली आहे. कळमना आणि नागपूरच्या बाजारात सर्वच प्रकारच्या तांदळाला मागणी आहे. मुख्यत्त्वे चिन्नोर आणि जय श्रीराम तांदळाची जास्त विक्री होते. याच तांदळाचे भाव वाढल्याने ग्राहकांना फटका बसत आहे. चिन्नोर ५८ रुपये तर वैदर्भीय जय श्रीराम ४५ ते ५२ रुपयांपर्यंत भाव आहेत. उमाठे म्हणाले, यंदा चीन, व्हिएतनाम आणि अफ्रिकन देशांमध्ये निर्यात वाढल्याने देशांतर्गत किमतीत वाढ होत आहे. वित्तीय वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निर्यातीत ७० टक्के वाढ झाली आहे. पुढे भाव कमी होण्याची काहीही शक्यता नसल्याचे उमाठे यांनी स्पष्ट केले.