रागसंगीतांच्या संमिश्रतेने रंगलेले गायन
By Admin | Updated: June 30, 2014 00:46 IST2014-06-30T00:46:15+5:302014-06-30T00:46:15+5:30
अमेरिकेतल्या व्यस्त दिनक्रमातून शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या उच्चविद्याविभूषित अभियंता दीपाली घाटे-देगलूरकर यांच्या गायनाने रसिकांना आनंद मिळाला. या मैफिलीचे आयोजन

रागसंगीतांच्या संमिश्रतेने रंगलेले गायन
सप्तकचे आयोजन : दीपाली घाटे-देगलूरकर यांची मैफिल
नागपूर : अमेरिकेतल्या व्यस्त दिनक्रमातून शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या उच्चविद्याविभूषित अभियंता दीपाली घाटे-देगलूरकर यांच्या गायनाने रसिकांना आनंद मिळाला. या मैफिलीचे आयोजन सप्तक संस्थेच्यावतीने करण्यात आले. मूळ नागपूरच्या या गायिकेने आपल्या गानप्रतिभेने रसिकांची दाद घेतली. गुरूकडून आत्मसात केलेल्या रागसंगीताचे हे प्रामाणिक व श्रवणीय सादरीकरण होते. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात पार पडला.
दीपाली यांनी वयाच्या ५ व्या वर्षापासून शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या गायन शैलीचे धडे माता रंजना घाटे यांच्याकडे गिरविले. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस आणि त्यानंतर विख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.
त्यामुळेच दीपाली यांच्या गायनात किराणा, ग्वाल्हेर व जयपूर-अत्रोली घराण्याच्या खास सौंदर्यात्मक संमिश्र गाण्यांनी ही मैफिल रंगतदार ठरली. राग बागेश्रीने त्यांनी गायनाला प्रारंभ केला. विलंबित एकताल निबद्ध ‘कौन गत भयी...’ आणि मध्य लयीत ‘आयी रे सनन सन घन आयी...’ तर द्रुत लयीत ‘ना डारो रंग मोपे...’ या बंदिशींनी त्यांनी सुखावह रागाची बढंत सादर केली. त्यानंतर राग मिश्र खमाजमधील उपशास्त्रीय प्रकारातील दादरा ‘छोड गये मोहे सपनो मे श्याम...’ ही चीज त्यांनी सादर केली.
तबल्यावर राजू गुजर, संवादिनीवर श्रीकांत पिसे तर तानपुऱ्यावर मोनिका देशमुख आणि संपदा देगलुरकर हिने कंठसंगत केली. प्रास्ताविक रेणुका देशकर यांनी केले. कलावंतांचे स्वागत नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, उदय पाटणकर, नितीन सहस्रबुद्धे, मानेकर व सहकाऱ्यांनी आयोजित केला. याप्रसंगी मोठ्या संख्येने रसिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)