फेरमूल्यांकन ‘सुपरफास्ट’
By Admin | Updated: June 5, 2014 01:01 IST2014-06-05T01:01:21+5:302014-06-05T01:01:21+5:30
फेरमूल्यांकनाच्या निकालास होणारा विलंब टाळण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ प्रशासनाने आता एक अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार फेरमूल्यांकनाचे निकाल

फेरमूल्यांकन ‘सुपरफास्ट’
‘डिजिटल’ पद्धत : ३0 दिवसांत निकाल
नागपूर : फेरमूल्यांकनाच्या निकालास होणारा विलंब टाळण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ प्रशासनाने आता एक अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार फेरमूल्यांकनाचे निकाल आता ३0 दिवसांत विद्यार्थ्यांंच्या हाती पडणार आहेत. ही प्रणाली संपूर्णपणे ‘डिजीटल’ असेल व याची सुरुवात यंदाच्या उन्हाळी परीक्षांपासूनच अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठातर्फे बुधवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनाच्या निकालांमध्ये होणार्या विलंबामुळे सातत्याने आंदोलन होताना दिसून येतात. विशेषत: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांंना याचा फटका बसतो. त्यातून विद्यापीठ व परीक्षा विभागावर दोषारोप करण्यात येतात. ही बाब टाळण्यासाठी विद्यापीठाने आता निकालांचा वेग वाढविण्यासाठी नवीन प्रयोग सुरू करण्याचे ठरविले आहे. यानुसार विद्यार्थ्यांंनी थेट फेरमूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर ३0 दिवसांच्या आता त्यांचा निकाल लागेल, असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. या प्रणालीची सुरुवात अभियांत्रिकी शाखेपासून प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
सबकुछ ‘ऑनलाईन’: विद्यापीठाने निकाल लवकरात लवकर लागावे यासाठी ही प्रणाली पूर्णपणे ‘डिजीटल’ करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांंंना निकाल लागल्यानंतर फेरमूल्यांकन करायचे असेल तर त्यांनी महाविद्यालयांच्या मार्फत अर्ज करायचा आहे. त्यानंतर त्यांना विद्यापीठाकडून एक ‘पिन’ क्रमांक देण्यात येईल व ‘झेरॉक्स’ प्रतिऐवजी त्यांना ७ दिवसांत थेट विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच उत्तरपत्रिकेची प्रत पहायला मिळेल. ‘पिन’ क्रमांक टाकून ही प्रत त्यांना पाहता येईल.