महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
By आनंद डेकाटे | Updated: December 18, 2025 23:42 IST2025-12-18T23:40:55+5:302025-12-18T23:42:43+5:30
निलंबनाची कारवाई तीन दिवसात मागे घेणार

महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई ३ दिवसात मागे घेतली. यासह इतर मुद्यांवरही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेवर समाधान व्यक्त करत महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
मुंबई मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात राज्यातील विविध महसूल संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत एकूण १३ मुद्यांवर जवळपास ३ तास सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रकरणात निलंबित अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन तीन दिवसात मागे घेणार, त्यासाठी विभागीय आयुक्तांकडून तात्काळ अहवाल मागिवणार, पालघरमधील कर्मचाऱ्याचे निलंबन तात्काळ मागे घेण्यातयेईल, असे आश्वासन देण्यात आले. यासोबतच विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ या मुख्य महासंघाशी जोडलेल्या महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, विदर्भ पटवारी संघ (नागपूर-२), विदर्भ (राजस्व निरीक्षक) मंडळ अधिकारी संघ, नागपूर, विदर्भ कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ, महाराष्ट्र राज्य महसूलसेवक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महसूलमंत्र्यांनी दिलेले आश्वासन व विविध विषयाबाबत सकारात्मक भूमिका याबाबत शुक्रवारपासून पुकारण्यात आलेले राज्यव्यापी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले आहे.
महसूल विभागाचा लवकरच नवा आकृतीबंध
महसूल विभागाचा लवकरच नवा आकृतीबंध, ग्रेड-पेबाबत शासन सकारात्मक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तलाठी संवर्गातून परीक्षेच्या माध्यमातून नायब तहसीलदारांची पदे भरण्यासही त्यांनी होणार दर्शविला. आंदोलन काळातील पगार न कापण्यासही सकारात्मकता दर्शविण्यात आली. महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचा नवीन 'आकृतीबंध' तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात संघटनांच्या सूचना विचारात घेतल्या जातील, असेही बैठकीत ठरले.