महसुली उत्पन्न घटले
By Admin | Updated: November 7, 2016 02:48 IST2016-11-07T02:48:25+5:302016-11-07T02:48:25+5:30
मुद्रांक कार्यालयात शहर विभागाच्या महसुली उत्पन्नात ६.४९ कोटी रुपयांनी घट झाली आहे.

महसुली उत्पन्न घटले
मुद्रांक कार्यालय : सहा महिन्यात २६७.५१ कोटींची वसुली, ७०० कोटींचे लक्ष्य
नागपूर : मुद्रांक कार्यालयात शहर विभागाच्या महसुली उत्पन्नात ६.४९ कोटी रुपयांनी घट झाली आहे. तुलनात्मकरीत्या गेल्यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत २७४ कोटी तर यावर्षी याच काळात २६७.५१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. (प्रतिनिधी)
जमिनीची विक्री कमी
गेल्यावर्षी नागपूर शहर विभागाला ९१४ कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे लक्ष्य होते. पण विभागाने ६४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठले. उत्पन्नाचे लक्ष्य पूर्ण न केल्यामुळे शासनाने यावर्षी नागपूर विभागाला ७०० कोटी रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सहा महिन्यात शहर विभागाला २६७.५१ कोटी रुपयांचे प्राप्त झाले आहेत. नागपुरात मागणीअभावी शेतजमीन, प्लॉट आणि फ्लॅटच्या विक्रीत लक्षणीय घट झाल्यामुळे मुद्रांक महसुली उत्पन्न कमी झाल्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ (उच्च श्रेणी) व मुद्रांक जिल्हाधिकारी (नागपूर शहर) राजेश राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
ग्रामीणमध्ये सात महिन्यात ९३.९१ कोटींचे उत्पन्न
शहराच्या तुलनेत ग्रामीण विभागाचे उद्दिष्ट १८५ कोटी रुपये आहे. त्यानुसार ३१ आॅक्टोबर २०१६ पर्यंत ९३.९१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी १७३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आणखी सहा महिने आहेत. दिवाळीनंतर उत्पन्नात वाढ होईल. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत लक्ष्य गाठणार असल्याचे सहा जिल्हा निबंधक वर्ग-१ (निम्न श्रेणी) व मुद्रांक जिल्हाधिकारी (नागपूर ग्रामीण) ए.एस. उघडे यांनी सांगितले.
शासनाचे लक्ष्य गाठणार
पूर्वी मिहानमध्ये जमीन खरेदीत बूम होती. मोठ्या टाऊनशिपमध्ये लागणाऱ्या कागदपत्रांनुसार मुद्रांकाद्वारे उत्पन्न मिळायचे. पण आता लहान टाऊनशिपमध्ये विक्री होत आहे. स्रोतानुसार आणि चुकविलेल्यांचा शोध घेऊन वसुली करण्यात येत आहे. त्याद्वारे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आहे. प्राप्त उत्पन्न सहा महिन्याचे आहे. पुढील सहा महिन्यात ७०० कोटींचे लक्ष्य गाठणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. याशिवाय मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १ जुलैपासून एक टक्का कर आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत जवळपास १.५ कोटी रुपये वसुली झाल्याचे राऊत म्हणाले.