महसूल अभियान महिला सक्षमीकरण म्हणून राबवणार
By Admin | Updated: July 31, 2016 02:41 IST2016-07-31T02:41:43+5:302016-07-31T02:41:43+5:30
येत्या १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महाराजस्व अभियान हे महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती....

महसूल अभियान महिला सक्षमीकरण म्हणून राबवणार
१ ते ७ आॅगस्टपर्यंत विशेष मोहीम :
विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची माहिती
नागपूर : येत्या १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महाराजस्व अभियान हे महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. यावर्षीचे महसूल अभियान हे महिला सक्षमीकरण म्हणून राबविण्यात येणार असून ‘ताई, मावशी, आक्का आता जग जिंका’ असे घोषवाक्य असून या सप्ताहभरात जिल्हा, तालुका व गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण सप्ताह दरम्यात लक्ष्मी-मुक्ती योजनेंतर्गत ७/१२ उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्कांची नोंद करणेसाठी विशेष मोहीम राबविणे, वारस नोंदी करतांना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास तर नव्याने वारस नोंद घेणे, तसेच महिला खातेदारांच्या अधिकार अभिलेख विषयीचे अर्जावर प्राधान्याने कारवाई करणे, महिला खातेदारांच्या वहिवाट किंवा पांदण रस्त्यांसंदर्भात असलेल्या तक्रारीवर प्राधान्याने कारवाई करणे, महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यास विशेष मोहीम राबविणे, रोजगार हमी योजनेतील महिला जॉबकार्ड धारकांना विशेष मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे, शिधापत्रिकेवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नोंदणी करणे, मतदार यादीमध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुली व मतदार नोंदणी न झालेल्या महिलांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविणे, महिला खातेदारांचा अधिकार अभिलेख विषयीचे अर्जावर प्राधान्याने कारवाई करणे, वन जमिनीचे पट्टे वाटप करणे, उज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन देणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे व विविध योजनांची माहिती देणे, महिलांना आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र देणे, ग्रामपंचायत मधील नमुना ८-अ मध्ये पतीच्या नावासोबत महिलांच्या नावाची नोंद करणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवेच्या नावाने आॅटोरिक्षा परवाना देणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन वाटप आदी योजना राबवल्या जातील. (प्रतिनिधी)