अपमान केल्यामुळे उगवला सूड : आरोपीची कबुली
By Admin | Updated: January 17, 2015 02:37 IST2015-01-17T02:37:03+5:302015-01-17T02:37:03+5:30
रितेशने दोन आठवड्यांपूर्वी चार चौघांसमोर मारहाण केली होती. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याचा गेम केल्याची कबुलीवजा माहिती रितेश बैसवारे खूनप्रकरणातील सूत्रधार ...

अपमान केल्यामुळे उगवला सूड : आरोपीची कबुली
नागपूर : रितेशने दोन आठवड्यांपूर्वी चार चौघांसमोर मारहाण केली होती. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याचा गेम केल्याची कबुलीवजा माहिती रितेश बैसवारे खूनप्रकरणातील सूत्रधार अश्विन तुर्केलने पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी रात्री पुन्हा एका आरोपीला अटक केली. संदीप महतो असे आरोपीचे नाव असून तो पांढराबोडीत राहातो.
१३ जानेवारीला सकाळी धरमपेठच्या बारबेरियन जीमजवळ रितेश बैसवारेचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी अश्विन तुर्केल आणि निखिल डागोरला अटक करून त्यांची २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली. त्यांची चौकशी केल्यानंतर संदीप महतोला अटक करण्यात आली. तो न्यायालयात सफाई कर्मचारी आहे.
रितेश आपल्यास नेहमीच अपमानित करीत असून मित्रांच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देत होता. २९ डिसेंबरला रितेशने चार चौघांसमोर कानशिलात लगावून जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा अपमान असह्य झाल्यामुळे अश्विनने रितेशचा गेम करण्याचा कट रचला. आपल्या खास मित्रांना त्याने त्यात सहभागी करून घेतले. त्यानंतर शस्त्रे विकत घेऊन घरात लपवून ठेवली. रितेशचा अनेक दिवस पाठलाग करून त्याची दिनचर्या माहीत करून घेतली. तो जीमजवळ एकटा सापडतो, हे ध्यानात आल्यानंतर त्याचा खून करून अपमानाचा सूड उगवल्याचे अश्विनने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)