आरपीएफकडून मौल्यवान चिजवस्तू 'ज्यांच्या त्यांना' परत; ५१:१३ लाखांचे साहित्य पोहचले मूळ मालकाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 20:33 IST2023-06-10T20:32:59+5:302023-06-10T20:33:42+5:30
Nagpur News रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)ने मे - २०२३ मध्ये 'ऑपरेशन अमानत' राबवून चोर- भामट्यांकडून जप्त केलेला ५१:१३ लाखांचा ऐवज रेल्वे प्रवाशांना परत केला.

आरपीएफकडून मौल्यवान चिजवस्तू 'ज्यांच्या त्यांना' परत; ५१:१३ लाखांचे साहित्य पोहचले मूळ मालकाकडे
नागपूर : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)ने मे - २०२३ मध्ये 'ऑपरेशन अमानत' राबवून चोर- भामट्यांकडून जप्त केलेला ५१:१३ लाखांचा ऐवज रेल्वे प्रवाशांना परत केला. चोरी गेलेला, हिसकावून नेलेला माैल्यवान दागिना अथवा चिजवस्तू अनपेक्षीतपणे परत मिळाल्याने ११९ प्रवासी आनंदले आहेत.
प्रवासाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे जरा का लक्ष विचलित झाले तर चोर, भामटे हात दाखवितात. कधी कुुणाची दागिने आणि रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू असलेली पर्स लांबविली जाते. कुणाचे मंगळसूत्र तर कुणाचा मोबाईल लंपास केला जातो. यामुळे अस्वस्थ झालेले प्रवासी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करतात. नंतर पोलीस त्याचा शोध घेतानाच संबंधित चोरीच्या गुन्ह्याची तक्रार वजा माहिती आरपीएफलाही कळविते.
रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची दुहेरी जबाबदारी सांभाळणारे आरपीएफचे जवान टप्प्यात आलेल्या चोर भामट्यांना कधी धावत्या रेल्वेत तर कधी वेगवेगळ्या रेल्वेस्थानकावर पकडतात आणि नंतर चाैकशी करून त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करून त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली करतात. गेल्या मे महिन्यात आरपीएफने 'ऑपरेशन अमानत' राबवून ११९ चोरीच्या तक्रारीतील ५१ लाख, १३ हजारांचे साहित्य जप्त केले. हे साहित्य ज्या प्रवाशांचे आहे, त्यांची ओळख पटवून ते त्यांना परत करण्यात आले.
ज्यात रोख रक्कम, दागिने, मोबाईल, पर्स, बॅग, लॅपटॉप आणि अन्य माैल्यवान चिजवस्तूंचा समावेश आहे.