७८८ विद्यार्थ्यांचे निकाल थांबले, २३ जणांचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST2021-07-17T04:08:02+5:302021-07-17T04:08:02+5:30
आशिष दुबे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. मूल्यांकनावर निकाल आधारित असूनदेखील ...

७८८ विद्यार्थ्यांचे निकाल थांबले, २३ जणांचा झाला मृत्यू
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. मूल्यांकनावर निकाल आधारित असूनदेखील राज्यात सर्वांत कमी ९९.८४ टक्के इतका निकाल लागला. मंडळाने कुठलीही परीक्षा आयोजित केली नव्हती, तरीदेखील ०.१६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले? यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्यक्षात मंडळात दहावीसाठी १ लाख ५५ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यातील १ लाख ५२ हजार २६३ विद्यार्थ्यांना यशस्वी घोषित करण्यात आले. ६ हजार ६५४ पुनर्परीक्षार्थींनी अर्ज केला होता. त्यातील ५ हजार ८३३ ना उत्तीर्ण घोषित करण्यात आले. परीक्षेत १ हजार ६३ विद्यार्थी अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. यात नियमित २४३, तर पुनर्परीक्षार्थी ८२१ इतके आहेत.
‘लोकमत’ने यासंदर्भात विविध अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, अनुत्तीर्ण घोषित करण्यात आलेल्यांपैकी ७८८ विद्यार्थ्यांचे निकाल नागपूर विभागीय कार्यालयाने थांबविले आहेत, तर १२४ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ३ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क दिलेले नाही. ७६ विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक अर्ज भरले होते, तर इतर कारणांमुळे २२ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. शाळांकडून मंडळाला पाठविण्यात आलेल्या माहितीत हे कारण सांगण्यात आलेले नाही.
काही त्रुटी आढळल्या होत्या
यासंबंधात मंडळाच्या विभागीय सचिव माधुरी सावरकर यांच्याशी संपर्क केला असता, शाळांकडून देण्यात आलेल्या ७८८ विद्यार्थ्यांच्या माहितीत व मंडळाच्या रेकॉर्डमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांचे निकाल थांबविण्यात आले. शाळांकडून माहिती मागवून त्याची पडताळणी करण्यात येईल व त्यानंतर निकाल घोषित होतील, असे त्यांनी सांगितले.