आरटीओ कार्यालयांमधील दलालीला लागणार लगाम
By Admin | Updated: May 10, 2014 23:50 IST2014-05-10T23:50:30+5:302014-05-10T23:50:30+5:30
वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना हवा आहे? मग दलालाच्या हातात ३०० रुपये द्या आणि कोणतीही चाचणी न देता परवाना मिळवा,

आरटीओ कार्यालयांमधील दलालीला लागणार लगाम
मनोज ताजने - गोंदिया
वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना हवा आहे? मग दलालाच्या हातात ३०० रुपये द्या आणि कोणतीही चाचणी न देता परवाना मिळवा, हीच पद्धत आतापर्यंत राज्यातील बहुतांश आरटीओ कार्यालयांमध्ये सुरू होती. पण आता याला लगाम बसणार आहे. शिकाऊ परवाना मिळवू इच्छिणार्या प्रत्येकाला आता संगणकीय चाचणीतून जावे लागणार आहे. त्यासाठी एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेशन कॉर्पोरेशन) या सरकारी कंपनीने विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. प्रथम पुणे जिल्ह्यातील बारामती येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून या संगणकीय चाचणीला सुरूवात करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ही प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. आतापर्यंतच्या कार्यपद्धतीत कोणीही नवखा उमेदवार शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात गेला आणि त्याने सर्व सोपस्कार पूर्ण केले तरी तो जर दलालामार्फत आला नाही तर त्याला कठीण प्रश्न विचारून परिवहन निरीक्षक नापास केल्याशिवाय राहात नव्हते. त्यामुळे परवाना हवा असेल तर दलालामार्फत जाणे हा अलिखित नियमच झाला होता. त्यात अधिकार्यांचेही अर्थपूर्ण संबंध राहात होते. पण आता संगणकीय चाचणीत उमेदवाराला वाहतुकीच्या नियमांची किती जाण आहे हे स्पष्टपणे दिसणार आहे. या आठ मिनिटांच्या चाचणीत उमेदवाराला १६ प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर देण्यासाठी तिथे काही पर्याय सुद्धा दिलेले असतील. योग्य पर्यायासमोर ‘क्लिक’ करण्यासाठी केवळ ३० सेकंदाचा वेळ दिला जातो. त्या वेळात उत्तर दिले नाही तर तो प्रश्न मिटून दुसरा प्रश्न समोर येतो. अशा पद्धतीने दिलेल्या वेळेत १६ पैकी किमान ९ प्रश्नांची उत्तरे (६० टक्के) बरोबर देणारा या चाचणीत उत्तीर्ण होतो. वाहतूक निरीक्षकाच्या देखरेखीत ही चाचणी होत असली तरी त्या कक्षाचे सीसीटीव्ही कनेक्शन सहायक परिवहन अधिकार्यांच्या टेबलवर असल्यामुळे ते आपल्या कक्षातूनच सर्वांवर नजर ठेऊ शकतात.