राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांतात जबाबदारी बदल, तामशेट्टीवार नवे प्रांत संघचालक
By योगेश पांडे | Updated: November 26, 2023 20:46 IST2023-11-26T20:46:46+5:302023-11-26T20:46:55+5:30
विदर्भ प्रांताच्या कारंजा घाडगे येथे आयोजित बैठकीदरम्यान ही घोषणा करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांतात जबाबदारी बदल, तामशेट्टीवार नवे प्रांत संघचालक
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपकराव तामशेट्टीवार यांच्याकडे प्रांत संघचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याअगोदर राम हरकरे यांच्याकडे हे पद होते. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच पुढील निवडणूकांमध्ये मतदान वाढीवर संघाचा भर राहणार आहे. अशा स्थितीत संघ मुख्यालयाचे स्थान असलेल्या विदर्भातील हे बदल महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
विदर्भ प्रांताच्या कारंजा घाडगे येथे आयोजित बैठकीदरम्यान ही घोषणा करण्यात आली. तामशेट्टीवार हे मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथील असून त्यांनी संघात विविध जबाबदाऱ्यांवर काम केले आहे. नागपूर महानगराचे सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांच्याकडे प्रांत सहसंघचालकपद देण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून ते नागपूर महानगराची जबाबदारी सांभाळत होते. ते चंद्रशेखर राठी यांची जागा घेतील. विदर्भ प्रांताची उर्वरित कार्यकारिणी कायम असेल अशी माहिती देण्यात आली आहे.