निवासी डॉक्टर आक्रमक, उपसले संपाचे हत्यार!
By सुमेध वाघमार | Updated: February 22, 2024 18:32 IST2024-02-22T18:30:18+5:302024-02-22T18:32:00+5:30
मेयो, मेडिकलच्या वाढल्या अडचणी

निवासी डॉक्टर आक्रमक, उपसले संपाचे हत्यार!
नागपूर : प्रत्येक निवासी डॉक्टरला वसितगृहाची सोय, विद्यावेतनात १० हजार रुपयांची वाढ आणि दर महिन्याला १० तारखेच्या आत विद्यावेतन देण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ आक्रमक झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपासून त्यांनी संपाचे हत्यार उपसले. यामुळे मेयो, मेडिकलच्या अडचणी वाढल्या असून संप कायम राहिल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विविध मागण्यांसाठी ‘सेंट्रल मार्ड’ने २०२३ मध्ये संप पुकारला होता. त्यावेळी शासनाकडून निश्चीत तारखेला विद्यावेतन व वसितगृहाची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. मागील महिन्यात पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागासोबत बैठक झाली. ‘मार्ड’ने आपल्या मागण्या रेटून धरल्या. मात्र, आश्वासनापलिकडे पदरी काहीच पडत नसल्याचे पाहत, अखेर ‘सेंट्रल मार्ड’ने ७ फेब्रुवारीपासून संपाचा इशारा दिला.
या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला. परंतु त्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी होऊनही या संदर्भात शासन निर्णय आणि इतर मागण्यांसंदर्भात सरकारने ठोस पावले उचलली नाही. यामुळे संप पुकारण्यात आल्याचे ‘मार्ड’चे म्हणणे आहे. गुरुवारी सांयकाळी ५.३०वाजता निवासी डॉक्टरांनी मेडिकलच्या ‘ओपीडी’समोर नारे निदर्शने केले.
संपातून आप्तकालीन विभाग वगळले
मेडिकल ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. शुभम महाल्ले म्हणाले, या संपातून आपत्कालीन विभाग व आपत्कालीन स्थितीतील शस्त्रक्रिया वगळण्यात आल्या आहेत. येथेच निवासी डॉक्टर आपली सेवा देतील. परंतु बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड व नियोजित शस्त्रक्रियेत डॉक्टर मदत करणार नाहीत. ‘सेंट्रल मार्ड’च्या पुढील सूचना येईपर्यंत संप सुरू राहिल.