शैक्षणिक संस्थांनी संशोधक घडवावेत
By Admin | Updated: April 12, 2015 02:29 IST2015-04-12T02:26:58+5:302015-04-12T02:29:11+5:30
विदर्भात मुबलक खनिज संपत्ती, जंगल आहे. या संपत्तीचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

शैक्षणिक संस्थांनी संशोधक घडवावेत
नागपूर : विदर्भात मुबलक खनिज संपत्ती, जंगल आहे. या संपत्तीचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आणि बुद्धिजीवी व्यक्तींनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न देता चांगले संशोधक घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले.
झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्यावतीने विदर्भाच्या विकासासाठी जागरुकता घडविण्यासाठी आयोजित ‘विदर्भ विकासाचे स्वप्न : सद्यस्थिती आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी झुलेलाल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष महेश साधवानी होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. पी. काणे, माजी कुलगुरु डॉ. व्ही. एस. देशपांडे, झुलेलाल इन्स्टिट्यूटचे सचिव वीरेंद्र कुकरेजा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. व्ही. क्षीरसागर, निको समूहाचे अध्यक्ष बसंतलाल शा, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, झुलेलाल इन्स्टिट्यूटचे संचालक प्रमोद पांपटवार, जय सहजरामानी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात मुबलक खनिज संपत्ती आहे. परंतु तरीसुद्धा विदर्भ विकासाच्या बाबतीत मागे आहे. अनेक व्यक्तींनी साधारण बुद्धिमत्ता असताना वेगळा विचार करून यश प्राप्त केले.
त्यामुळे अशी वेगळी वहिवाट धुंडाळून विदर्भातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे.
विदर्भात उपलब्ध कच्च्या मालापासून वीज, वस्त्र, खाद्यपदार्थ, पेय पदार्थ तसेच बायोडिझेल, बायोगॅस तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चरचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला सिनेट सदस्य डॉ. डी. के. अग्रवाल, प्रमोद वैरागडे, प्रवीण बालानी, झुलेलाल इन्स्टिट्यूटचे संचालक गिरीश साधवानी, प्राचार्य एस. एस. लिमये, उपप्राचार्य डॉ. डी. भौमिक आणि विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)