संशोधनात ‘इनोव्हेशन’ हवे

By Admin | Updated: July 13, 2014 00:57 IST2014-07-13T00:57:35+5:302014-07-13T00:57:35+5:30

सध्या भारताची ‘जुगाड टेक्नॉलॉजी’ चा उपयोग करणारा देश म्हणून जगभरात बदनामी होत आहे. आज जगाचा हा दृष्टिकोन बदलविण्याची गरज आहे. यासाठी ज्ञान व विज्ञान क्षेत्रातील बदलासह संशोधनात

Research requires 'Innovation' | संशोधनात ‘इनोव्हेशन’ हवे

संशोधनात ‘इनोव्हेशन’ हवे

‘मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ वितरण सोहळा : रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन
नागपूर : सध्या भारताची ‘जुगाड टेक्नॉलॉजी’ चा उपयोग करणारा देश म्हणून जगभरात बदनामी होत आहे. आज जगाचा हा दृष्टिकोन बदलविण्याची गरज आहे. यासाठी ज्ञान व विज्ञान क्षेत्रातील बदलासह संशोधनात ‘इनोव्हेशन’ची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक व पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
वनराई फाऊंडेशनच्यावतीने ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ ज्येष्ठ संशोधक व पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना शनिवारी एका समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूतल व परिवहन मंत्री नितीन गडकरी व नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे होते. मंचावर वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी व अनंत घारड उपस्थित होते. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. मोहन धारिया यांच्याविषयी बोलताना, धारिया यांनी देश सुजलाम, सुफलाम व हिरवागार करण्यासाठी आयुष्यभर काम केल्याचे सांगितले. सोबतच यावेळी त्यांनी वनराई फाऊंडेशनकडून पुरस्कार स्वरूपात मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम व त्यात स्वत:कडील ५० हजार रुपये टाकून एकूण दीड लाख रुपयांची रक्कम मुंबई येथील केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटला संशोधन कार्यासाठी भेट देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी केंद्रीय भूतल व परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशात मोठमोठे संशोधन होत आहे. पण तरीही शेतकरी आत्महत्या करीत आहे. लाखो जनता भुकेने व्याकूळ व गरिबीने त्रस्त आहे. कारण प्रयोगशाळेतील ज्ञान, विज्ञान व संशोधन चार भिंतीत अडकून पडले आहे. ते तंत्रज्ञान गावांपर्यंत पोहोचल्याशिवाय देश सुखी होणार नाही. मात्र यासाठी नवनवीन तंत्रज्ञान गावांपर्यंत पोहोचले पाहिजे. देशातील कृषी व ग्रामीण क्षेत्रात ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची गरज आहे. असे झाल्यास देशात फार मोठी क्रांती व विकास घडून येईल. याशिवाय कमीत कमी किमतीत लोकांना शुद्ध पाणी कसे मिळेल, याचाही विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. अनंत घारड यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Research requires 'Innovation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.