नागपूर : कृषी व उद्योग दोन्ही क्षेत्र एक दुसर्यांला पूरक मानले जातात. त्यामुळेच अलीकडे मोठमोठ्या खाजगी कंपन्या कृषी क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहित करण्यासाठी पुढे सरसावत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी मुंबई येथील मिक्स मल्टि मीडिया कंपनीच्यावतीने कृषी महाविद्यालयातील रियाज पटेल या विद्यार्थ्याला मक्यावरील विशेष संशोधनासाठी ‘अनन्या ’ शिष्यवृत्ती प्रदान करून, त्याचा गौरव करण्यात आला. त्याने ‘मक्याची तुरा काढणे व अन्न द्रव्य व्यवस्थापन यांचा मक्याच्या वाढीवर व उत्पादनावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन केले आहे. यानिमित्त शनिवारी कृषी महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात दिल्ली येथील कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांच्या हस्ते रियाज पटेल याला शिष्यवृत्ती स्वरूपात २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मिक्स मल्टि मीडिया कंपनीचे व्यवस्थापक एस. एस. गंगाराजू, डॉ. डी. एस. पंचभाई, डॉ. एस. आर. पोटदुखे, डॉ. व्ही. एस. टेकाळे, डॉ. शांती पाटील व प्रा. आर. डब्ल्यू गावंडे उपस्थित होते. सुरुवातीला ‘अनन्या’ शिष्यवृत्तीसाठी कृषी महाविद्यालयातील कृषीविद्या विभाग, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र, कृषी रसायनशास्त्र, कीटकशास्त्र, विस्तार शिक्षण, उद्यानविद्या व वनस्पतीरोगशास्त्र विभाग अशा आठ विभागातील विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी गंगाराजू व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. गोंगे यांच्या उपस्थितीत संबंधित आठही विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले. त्यातून रियाज पटेल या विद्यार्थ्याच्या संशोधनाची अंतिम निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)
संशोधकाच्या पाठीवर उद्योगजगताची थाप!
By admin | Updated: May 12, 2014 00:58 IST