संत्र्याच्या ३० नवीन प्रजातींवर संशोधन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:05+5:302021-07-28T04:08:05+5:30
नागपूर : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेत (सीसीआरआय) संत्र्याच्या ३० हून अधिक प्रजातींवर संशोधन सुरू आहे. यात मॅन्डेरिनच्या ...

संत्र्याच्या ३० नवीन प्रजातींवर संशोधन सुरू
नागपूर : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेत (सीसीआरआय) संत्र्याच्या ३० हून अधिक प्रजातींवर संशोधन सुरू आहे. यात मॅन्डेरिनच्या ४, स्विट ऑरेंजच्या १६, लाइम लेमनच्या ८ व ग्रॅपफ्रुटस्च्या काही प्रजातींचा समावेश असून लवकरच त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जातील, अशी माहिती सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली.केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेत (सीसीआरआय) संत्र्याच्या ३० हून अधिक प्रजातींवर संशोधन सुरू आहे. यात मॅन्डेरिनच्या ४, स्विट ऑरेंजच्या १६, लाइम लेमनच्या ८ व ग्रॅपफ्रुटस्च्या काही प्रजातींचा समावेश असून लवकरच त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जातील, अशी माहिती सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली.
संस्थेतर्फे यक्राे ग्रॅफ्टिंग’ व ‘शूट टीप ग्रॅफ्टिंग’ तंत्रज्ञानाद्वारे राेप निर्मिती व फळ उत्पादनापर्यंत लागणारा कालावधी कमी करण्यात यश आले आहे. संस्थेने गेल्या काही वर्षात मॅन्डेरिन सीडलेस-४, एनआरसीसी ॲसिड लाइम-७, ॲसिड लाइम-८, एनआरसीसी पामेलाे-५, एनआरसीसी ग्रॅपफ्रूट-६ या देशी प्रजाती, तर कटर व्हॅलेन्सिया, फ्लेम ग्रॅपफ्रूटस् व पामेलाे युएस-१४५ या विदेशी प्रजाती विकसित करून शेतकऱ्यांना पुरविल्या आहेत. त्यातील मॅन्डेरिनची देशपातळीवर लोकप्रिय ठरली आहे, असेही घोष यांनी स्पष्ट केले.
लिंबूवर्गीय फळे (संत्रा, माेसंबी आदी) हे देशभरातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक म्हणून गणले जाते. लाखाे लाेकांची उपजीविका यावर अवलंबून आहे. त्यानुसार दरवर्षी देशात शेतकऱ्यांद्वारे सात ते साडेसात लाख राेपांची मागणी असते. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेत (सीसीआरआय) दरवर्षी ३ लाख राेगमुक्त राेपांची निर्मिती करून त्यांचे शेतकऱ्यांना वितरण केले जाते. स्थापनेच्या तीन दशकात संस्थेने ४० लाखांपेक्षा अधिक राेपे तयार करून वितरित केली आहेत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, असा प्रश्न संस्थेला केला जाताे. मात्र, सीसीआरआय ही नर्सरी किंवा राेप तयार करणारे केंद्र नाही. ती संशाेधन संस्था असून, मुख्य काम लिंबूवर्गीय फळांवर संशाेधन करणे आहे.
संस्थेने गेल्या साडेतीन दशकात विविध संस्थांसह विद्यापीठांचे नेटवर्क तयार केले आहे. शेतकरी, संशाेधक, देश-विदेशातील विद्यार्थी अशा जवळपास ५३ हजार प्रतिनिधींना प्रशिक्षण दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रधान वैज्ञानिक डॉ. आशुतोष मुरकुटे उपस्थित होते.
आज ३७ वा स्थापना दिवस
२८ जुलै राेजी सीसीआरआय संस्थेचा ३७ वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त संस्थेच्या सभागृहात दुपारी ३.३० वाजता हाेणाऱ्या कार्यक्रमात आयसीएआरचे माजी चेअरमन डाॅ. सी.डी. मायी, आयसीएआर-एनसीएसएसचे संचालक डाॅ. बी.एस. द्विवेदी, काॅटन रिसर्च संस्थेचे संचालक डाॅ. वाय.जी. प्रसाद प्रामुख्याने उपस्थित राहतील.