घराघरातील लीडरशिपमुळे रिपब्लिकन चळवळ वाटली गेली : गंगाराम इंदिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:36 IST2019-07-08T22:34:57+5:302019-07-08T22:36:35+5:30
रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इंदिसे यांनी व्यक्त केली.

घराघरातील लीडरशिपमुळे रिपब्लिकन चळवळ वाटली गेली : गंगाराम इंदिस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इंदिसे यांनी व्यक्त केली.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचे नगरसेवक विकास निकम, पक्षाचे महासचिव उत्तम खडसे उपस्थित होते. इंदिसे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे झाले. प्रत्येक घरात लीडरशिप तयार झाल्याने ती वाटल्या गेली आहे. रिपाइंचे ऐक्य व्हावे, अशी आपली भूमिका राहिली आहे. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करीत आहोत. आपल्यासाठी निवडणुका दुय्यम आहेत. संघटना मजबूत करण्यावर आपला भर असल्याने एक दिवस रिपाइंचे ऐक्य नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात अनेक ठराव मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये ईव्हीएमने निवडणुका या पारदर्शी नसल्याने यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात, रेशन दुकानातून वाटण्यात येणाऱ्या विविध वस्तू पूर्वीप्रमाणेच वाटण्यात याव्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरण्यात येणारी बहुसदस्यीय पद्धत त्वरित रद्द करून त्याऐवजी पूर्वीची एकसदस्यीय पद्धत लागू करण्यात यावी, आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अॅड. राजेंद्र पाटील, भाईलाल गोहेल, प्रा. राहुल मून, बनवारीलाल सोनी, रामदास म्हात्रे, हरिदास टेंभुर्णे, नटवरलाल परमार, डॉ. सुनीलकुमार भार्गव, प्रल्हाद सोनवणे, दत्ता शिंदे, डॉ. चरणदास जनबंधू, मनोहर ओगळे आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
रिपाइंसाठी आपला गट विसर्जित करणार
विविध गटांमध्ये विभागल्या गेलेली रिपाइं ही एकसंघ राहावी. मूळ रिपब्लिकन पक्ष जो आहे, तो कायम राहावा, त्यात सर्व गटांनी एकत्र यावे, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याची सुरुवात आपण स्वत: करणार असून, मूळ रिपाइंमध्ये आपण आपला गट विसर्जित करून रिपाइंला मजबूत करणार असल्याचे इंदिसे यांनी यावेळी जाहीर केले.