१० दिवसांत द्यायचा होता अहवाल, १२ व्या दिवशी स्थापन झाली समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:57+5:302021-02-05T04:57:57+5:30
नागपूर : कार्यादेश जारी झालेल्या प्रस्तावांची प्राथमिकता निश्चित करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी ...

१० दिवसांत द्यायचा होता अहवाल, १२ व्या दिवशी स्थापन झाली समिती
नागपूर : कार्यादेश जारी झालेल्या प्रस्तावांची प्राथमिकता निश्चित करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिला होता. तसेच, समितीकडे १० दिवसांत अहवाल मागितला होता. परंतु, १० दिवसांत समितीच स्थापन करण्यात आली नाही. मनपा आयुक्तांनी मंगळवारी पत्र जारी करून यासंदर्भात ६ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली.
महापौरांनी गेल्या २० जानेवारी रोजी आयोजित आमसभेत तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्यात अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश करायचा होता. परंतु, समिती स्थापन करण्यासाठी १२ दिवस लावण्यात आले. तसेच, सदस्य संख्या वाढवून ६ करण्यात आली. ही कृती महापौरांच्या आदेशाचे उल्लंघन करणारी असल्याचे बोलले जात आहे. या समितीत अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे आणि कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर यांचा समावेश आहे. या समितीला १५ दिवसांमध्ये अहवाल सादर करायचा आहे. स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी समिती स्थापन झाल्याची व समितीचा अहवाल लवकरच येईल, अशी माहिती दिली. समिती स्थापन करण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी सांगितले.
------------
सभागृहाच्या आदेशाचा अवमान
संबंधित समिती स्थापन करून १० दिवसांत अहवाल द्यायचा होता. परंतु, समिती स्थापन करण्यासाठी १२ दिवस घेण्यात आले. आता अहवाल कधी येईल व कामे कधी सुरू होतील, हा प्रश्न आहे. प्रशासनाकडून सभागृहाच्या आदेशांचा अवमान होत आहे. त्यावरून महापौर दयाशंकर तिवारी यांना प्रशासन जुमानत नसल्याचे स्पष्ट होते.
- रमेश पुणेकर, नगरसेवक, काँग्रेस