जनआंदोलनाच्या फेरमांडणीवर खल
By Admin | Updated: June 29, 2014 00:39 IST2014-06-29T00:39:51+5:302014-06-29T00:39:51+5:30
जनआंदोलनाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू शकतात यावर विश्वास व्यक्त करतानाच बदलत्या काळात या आंदोलनाची फेरमांडणी करण्याची गरज जनआंदोलनात सहभागी विविध

जनआंदोलनाच्या फेरमांडणीवर खल
शेतकरी केंद्रबिंदू : पाच राज्यातील प्रतिनिधींचा समावेश
नागपूर : जनआंदोलनाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू शकतात यावर विश्वास व्यक्त करतानाच बदलत्या काळात या आंदोलनाची फेरमांडणी करण्याची गरज जनआंदोलनात सहभागी विविध राज्यातील प्रतिनिधींनी व्यक्त केली. जनआंदोलन करणाऱ्या विविध संघटनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘लोकविद्या जनआंदोलन’ या संघटनेतर्फे शनिवारपासून येथील विनोबा विचार केंद्रात जनआंदोलन कार्यकर्त्यांची बैठक सुरू झाली. यावेळी प्रामुख्याने शेतकरी नेते विजय जावंधिया, सुनील सहस्रबुद्धे, रूपाताई कुळकर्णी, श्रीनिवास खांदेवाले, मोहन हिराबाई हिरालाल, धनाजीराव गुरव, मोहन राव, जी.नारायणराव, चित्रा सहस्रबुद्धे, विलास भोंगाडे, अमिताभ पावडे व महाराष्ट्रातील प्रमुख जनआंदोलकांसह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या बैठकीत पहिल्या दिवशी जनआंदोलनाची दिशा, बदलते स्वरूप आणि लोकविद्या या प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या संपूर्ण चर्चेत शेतकरी आणि त्याचे प्रश्न केंद्रबिंदू होते. जनआंदोलनाचे पारंपरिक मुद्दे सोडून नवीन मुद्यांवर आधारित आंदोलनाची फेरमांडणी करावी लागेल, असा मतप्रवाह या बैठकीत व्यक्त करण्यात आला. इतरही विषय चर्चेला आले. सर्वसामान्यांच्या अंगभूत असलेल्या गुणांवर आधारित अर्थव्यवस्था व त्यासंदर्भातील राजकारण तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यावर वक्त्यांनी भर दिला.
शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले, शेतकऱ्याला शेती कशी करावी हे सांगावे लागत नाही. मात्र त्यांच्या अंगी असलेल्या या ज्ञानाकडे कुणाचेच लक्ष नाही, त्यांच्या प्रश्नांबाबतही सरकार गंभीर नाही, त्यामुळे त्याची दैनावस्था झाली आहे. जनआंदोलन करणाऱ्या संघटनांनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरावा.
सुनील सहस्त्रबुद्धे यांनी लोकविद्या आणि राजकारणाचे बदलते स्वरूप यावर विवेचन केले. अलीकडच्या काळात एका विशिष्ट गटाला डोळ्यापुढे ठेवून राजकारण केले जाते. यात शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी, दलितांच्या प्रश्नांना स्थान नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उत्पन्नाच्या स्रोताचे समान वाटप यावर त्यांनी भर दिला. रूपाताई कुळकर्णी यांनी लोकविद्येचं व्यासपीठ असावे अशी कल्पना मांडली. अमिताभ पावडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. देशात एक टक्का उद्योजक राजकारणावर प्रभाव ठेवून आहेत. मात्र शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के असताना केवळ ते संघटित नसल्याने त्यांचे प्रश्न दुर्लक्षित आहे. जनआंदोलकांनी या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे पावडे म्हणाले. रविवारीही ही बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)