मेट्रो रेल्वेच्या मार्गातील तीन जागांचा अडथळा दूर
By Admin | Updated: August 6, 2015 02:51 IST2015-08-06T02:51:21+5:302015-08-06T02:51:21+5:30
मेट्रो रेल्वेच्या मार्गातील शासकीय जागांच्या हस्तांतरणाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, ...

मेट्रो रेल्वेच्या मार्गातील तीन जागांचा अडथळा दूर
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या मार्गातील शासकीय जागांच्या हस्तांतरणाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, मार्गात येणाऱ्या तीन जागा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. मॉरिस कॉलेज वसतिगृहाच्या वार्डनचा बंगला, यशवंत स्टेडियमजवळील मैदान आणि सीआरपीएफच्या जागेचा यामध्ये समावेश आहे.
मेट्रो रेल्वे हा नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जात असून, यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मेट्रो रेल्वेचा मार्ग कामठी रोडवरील आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान, तर दुसरीकडे पारडी ते हिंगणा टी-पॉर्इंट असा ३८ कि.मी.चा राहणार आहे. यासाठी ६३ एकर जागेची आवश्यकता आहे. यापूर्वी मिहानची जागा हस्तांतरित करण्यात आली व या भागात कामाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. मिहाननंतर खरा अडथळा हा शहरातील जागांचा आहे. मेट्रोच्या मार्गात अनेक शासकीय कार्यालये, इमारती व खाजगी जागांचा समावेश आहे. मात्र हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी आणि मेट्रोच्या कार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला आहे. विविध स्तरावर बैठका घेऊन जागा हस्तांतरणाचे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या तत्परतेमुळे मेट्रोचा मार्ग आता सुकर होत असून, या मार्गातील तीन जागांचे हस्तांतरण झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी दिली. मॉरिस टी-पॉर्इंटजवळील वसतिगृहाच्या वार्डनच्या बंगल्याची २०३५ चौरस मीटर जागा, यशवंत स्टेडियमजवळ असलेल्या मैदानाची १.९८ हेक्टर जागा तसेच सीआरपीएफच्या मालकीची २.७ हेक्टर जागा हस्तांतरित झाल्याचे सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले.
सीआरपीएफला हिंगणा तालुक्यातील वायफळ येथील जागा देण्याबाबत ठरविण्यात आले असून, याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मैदानाची जागा मोकळीच असल्याने दुसरी जागा देण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. सोमवारीच शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि पटवर्धन शाळा हस्तांतरित करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली होती. जागा हस्तांतरणाच्या कामातील अडथळा दूर करण्यासाठी वेगाने हालचाली होत असल्याने मेट्रो वेळेतच धावणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)