रेमडेसिविर, ऑक्सिजन आणि लसही वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:21+5:302021-04-17T04:07:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थाही गडबडली आहे. रुग्ण व त्यांच्या ...

रेमडेसिविर, ऑक्सिजन आणि लसही वेटिंगवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थाही गडबडली आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बेडसाठी भटकावे लागत आहे. यातच ऑक्सिजनची कमतरता आहे. रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता आहे आणि कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे अस्त्र मानले जात असलेल्या लसीचा तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे.
प्रशासनापासून तर नेत्यापर्यंत सर्वच जण दावा करताहेत की, रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढला आहे. परंतु प्रत्यक्षात दररोज १५ हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. त्यामानाने दररोज चार ते पाच हजार इंजेक्शन पोहोचत आहेत. बुधवारी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर काळजीपूर्वक करीत ज्यांना गरज आहे त्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. काही रुग्णालयेसुद्धा यात सामील आहेत. गुरुवारीच पोलिसांनी या काळाबाजारचा भंडाफोड केला.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अडकले नवीन बेड
ऑक्सिजनची कुठलीही कमी नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. परंतु ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यास मंजुरी मिळालेली नाही. सूत्रानुसार या रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्यासाठी जवळपास १५ हजार आणखी सिलिंडरची आवश्यकता आहे. या दरम्यान रोज ३५ ते ४० हजार सिलिंडर लागत आहेत. दुसरीकडे होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्णही ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यावर भर देत आहेत. यामुळे मागणी प्रचंड वाढली आहे. दरम्यान, भिलाई, चंद्रपूर आदी शहरातून ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लसीकरणाची गतीही मंदावली
कोविड लसीकरणाची गतीही मंदावली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद झाले होते. बुधवारी लसीचा पुरवठा झाल्याने शासकीय केंद्र सुरू झाले. परंतु खासगी रुग्णालयातील काही केंद्रांवर आजही लोकांना लस मिळू शकली नाही.
लोकांचे जीव वाचविण्यालाच सर्वोच्च प्राधान्य
नागपुरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांचे म्हणणे आहे की, जिल्हा व मनपा प्रशासन कोरोना रुग्णांना आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. भोपाळ, भिलाईवरून ऑक्सिजन आणणे आणि एमआयडीसी येथील बंद पडलेला प्लांट सुरू करण्याचे प्रयत्नही होत आहेत. रेमडेसिविरचे उत्पादन वर्धा येथे करण्यासाठी पुढाकारही घेण्यात आलेला आहे.