आंबेकरची सुटका वांध्यात

By Admin | Updated: July 1, 2014 00:56 IST2014-07-01T00:56:40+5:302014-07-01T00:56:40+5:30

न्यायालयाची फसवणूक केल्याच्या एका प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नागपुरी डॉन संतोष आंबेकर याचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवाणी यांच्या न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केल्याने,

Release Ambekar | आंबेकरची सुटका वांध्यात

आंबेकरची सुटका वांध्यात

न्यायालय : ‘४२०’ च्या प्रकरणात पोलिसांनी घेतला प्रॉडक्शन वॉरंट
नागपूर : न्यायालयाची फसवणूक केल्याच्या एका प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नागपुरी डॉन संतोष आंबेकर याचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवाणी यांच्या न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केल्याने, त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सुटका वांध्यात आली आहे.
नुकताच उच्च न्यायालयाने आंबेकर याचा अनिवासी भारतीय पराग रामचंद्र गोंधळेकर यांची श्रद्धानंदपेठ येथील कोट्यवधीची मालमत्ता बळकावल्याच्या आणि बिल्डर जितेंद्र चव्हाण यांना अंबाझरी पोलीस ठाण्यात पिस्तुलाचा धाक दाखवून ६५ लाखाची खंडणी चेकच्या स्वरूपात वसूल करण्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे.
आजच मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयातून जामिनाची प्रक्रिया पूर्ण करून जेल अधीक्षकाच्या नावे सुटकेचा आदेश प्राप्त करण्यात आला. दरम्यान, आंबेकर हा सदर पोलीस ठाण्यात दाखल एका फसवणुकीच्या प्रकरणात पाहिजे असल्याने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस. एन. मुरकुटे यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी परवाणी यांच्या न्यायालयातून आंबेकरचा प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केला. आंबेकरला कारागृहातून ताब्यात घेण्याचा हा आदेश आहे.
असे होते फसवणुकीचे प्रकरण
संतोष आंबेकरचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (२७) याच्याविरुद्ध डिसेंबर २०१३ मध्ये लकडगंज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शैलेश हा तब्बल चार महिने फरार राहिल्यानंतर, अटकपूर्व जामीन प्राप्त करण्यासाठी त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
शैलेश याने सिनेस्टाईलने आपल्या इतर साथीदार व नातेवाईकाच्या मदतीने पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव आणून त्यांच्याकडून ती मानसिक रुग्ण असल्याचे खोटे शपथपत्र तयार करून घेतले होते. याशिवाय निधन झालेल्या डॉक्टरच्या बनावट सहीने पीडित मुलगी मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र तयार करून घेतले होते. शपथपत्र आणि प्रमाणपत्र त्याने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जासोबत संलग्न केले होते.
ही बनवाबनवी लक्षात येताच न्यायालयाने शैलेश याचा अर्ज फेटाळून लावला होता. याशिवाय न्यायालयाची फसवणूक झाल्याने शैलेश आणि साथीदारांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात १० फेब्रुवारी २०१४ रोजी भादंविच्या ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आंबेकरला २९ जानेवारी २०१४ रोजी अंबाझरी प्रकरणात अटक होताच शैलेशला या फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आंबेकरचे नाव असल्याने आता त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे कारागृहातून अटक केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Release Ambekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.