संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’ला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:13 IST2018-06-05T00:11:39+5:302018-06-05T00:13:36+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. एकीकडे सामाजिक समरसतेचे सूत्र घेऊन देशभरात कार्यविस्तार सुरू असताना ‘इफ्तार’ला नकार देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’ला नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. एकीकडे सामाजिक समरसतेचे सूत्र घेऊन देशभरात कार्यविस्तार सुरू असताना ‘इफ्तार’ला नकार देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मुस्लीम समुदायाशी फारसे जुळवून घेत नाही, अशा पद्धतीचा सर्वसाधारण समज आहे. हा समज खोडून काढण्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे गेल्या काही काळापासून ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देशातील अनेक भागात संघाचे पदाधिकारीदेखील यात सहभागी होताना दिसून आले. अगदी नागपुरातदेखील मागील वर्षी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा कार्यक्रम संघ स्मृतिमंदिरात व्हावा, अशी मंचच्या पदाधिकाºयांची इच्छा होती. यामुळे जगभरात एकतेचा संदेश जाईल, ही त्यामागची भावना होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली.
शहरात दोन ठिकाणी झाले आयोजन
संघ स्मृतिमंदिरात आयोजनाची विनंती नाकारण्यात आल्यानंतर मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे नागपुरात दोन ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले. २४ मे रोजी बुद्धूखां मिनार, गांधीबाग येथे तर १ जून रोजी संजीवनीनगर कॉलनी, यशोधरानगर येथे हे आयोजन करण्यात आले. मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर, महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख, युवा प्रकोष्ट संयोजक दिवानशाद अली, नागपूर संयोजक रियाज अहमद खान, शाहिद खान, फरह वासीम हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
...तर गेला असता मजबूत संदेश
यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख यांना संपर्क केला असता त्यांनी अशाप्रकारची विनंती केल्याचे मान्य केले. संघ स्मृतिमंदिरमध्ये कार्यक्रम झाला असता तर सामाजिक समरसतेचा संदेश जगामध्ये गेला असता. मात्र आम्ही ज्या पदाधिकाऱ्यांजवळ गेलो, त्यांनी आमच्या विनंतीचा विचार केला. मात्र आम्हाला परवानगी मिळू शकली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘इफ्तार’ला विरोध नाहीच. परंतु सद्यस्थितीत रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात संघाचा तृतीय वर्ष वर्ग सुरू आहे. त्यामुळे येथे ‘इफ्तार’चे आयोजन करणे शक्य झाले नसते. संघाचा असे मत एका संघ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.