सात जणींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By Admin | Updated: July 25, 2015 03:18 IST2015-07-25T03:18:21+5:302015-07-25T03:18:21+5:30

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगड येथे एका महिलेची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्या प्रकरणी सात महिला आरोपींचा ..

Rejecting the anticipatory bail of seven people | सात जणींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सात जणींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगड येथे एका महिलेची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्या प्रकरणी सात महिला आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
अनिता राजेश ऊर्फ रोशन वनवे (३५), मालती ऊर्फ माला विजय विश्वकर्मा (३५), गीता महादेवराव चिल्लोर (४०), मोहिनी ऊर्फ सुनीता राजेंद्र ठक्कर (४२), जुलिएट ऊर्फ सारसा राजेश जॉन (४५), दुर्गा टायगर राय (३५) आणि ऐश्वर्या राजेश वनवे, अशी आरोपी महिलांची नावे असून त्या सर्व सुरेंद्रगड येथील रहिवासी आहेत.
दुर्दैवी पीडित महिला ३१ वर्षांची असून तिची धिंड काढण्याची समाजाला कलंकित करणारी घटना ७ जुलै २०१५ रोजी भरदुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, या प्रकरणाची मुख्य सूत्रधार अनिता वनवे हिला या महिलेचे आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. घटनेच्या दिवशी पीडित महिला आपल्या घरी असताना अनिताने गैरकायद्याची मंडळी जमवून तिच्या घरावर धडक दिली होती. ‘तुझे माझ्या पतीसोबत संबंध आहेत’, असा आरोप करीत अनिता आणि मंडळीने पीडित महिलेला घराबाहेर काढले होते. अनिताने तिला मारहाण करीत आधी स्वत:च्या घरी नेले होते. ओढाताण आणि मारहाण होत असताना तिच्या अंगावरील संपूर्ण कपडे फाटले होते. तिच्या अंगावर केवळ अंतर्वस्त्र होते. तरीही निष्ठूर महिलांनी मारहाण करीत तिला अख्ख्या वस्तीत फिरवले होते. (प्रतिनिधी)
व्हिडिओ चित्रिकरणही केले
पीडित महिला ही मदतीसाठी इतर लोकांना विनवणी करीत होती. परंतु ही मंडळी त्यांना धमकावत होती. या महिलेची धिंड काढली जात असतानाच ही मंडळी आपल्या मोबाईलने तिचे व्हिडिओ चित्रिकरणही करीत होते. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, ३५४, ३५४ (ब), ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरण पोलिसात गेल्यापासून सर्व जणी फरार झाल्या आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता प्रकरण गंभीर असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पराग उके यांनी काम पाहिले.

Web Title: Rejecting the anticipatory bail of seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.