जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ‘रिहर्सल’

By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:17+5:302015-12-05T09:10:17+5:30

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तब्बल सहा वेळा ‘रिहर्सल’ करून पोलिसांनी अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांच्या संशयास्पद मृत्यूमागे दडलेले गूढ उकलण्याचे प्रयत्न केले.

'Rehearsal' in District Court Building | जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ‘रिहर्सल’

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ‘रिहर्सल’

श्रीकांत खंडाळकर मृत्यूप्रकरण : गूढ उकलण्यासाठी फेकला पुतळा
नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तब्बल सहा वेळा ‘रिहर्सल’ करून पोलिसांनी अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांच्या संशयास्पद मृत्यूमागे दडलेले गूढ उकलण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबला या ‘प्रात्यक्षिका’चे नमुने पाठवून अहवाल मागितला आहे.रविवारी दुपारी जिल्हा न्यायमंदिर परिसरात (इमारतीच्या मागच्या भागात) अ‍ॅड. खंडाळकर यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या खिशात आढळलेल्या ‘सुसाईड नोट’वरून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मात्र खंडाळकर आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांसह अनेकांनी केला आहे. त्यात कोर्टाच्या सातव्या माळ्याच्या खिडकीजवळ पाय घासल्याचे निशाण पोलिसांना दिसले. त्यांच्या गंभीर आजाराचे अद्याप निदान झाले नाही आणि त्यांचा मोबाईलही अद्याप सापडलेला नाही. या संशयास्पद बाबींमुळे हे प्रकरण कमालीचे रहस्यमय ठरले आहे.
सामाजिक दायित्वातून वकिली करणाऱ्या आणि जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अ‍ॅड. खंडाळकर यांचा संशयास्पद मृत्यू अधिवेशनाच्या तोंडावर झाल्यामुळे पोलीसही सर्व शक्यता तपासूनच चौकशी करीत आहेत.
सहा वेळा झाले प्रात्यक्षिक
या पार्श्वभूमीवर, खंडाळकरांच्या वजनाचा ८० किलोंचा डमी (पुतळा) पोलिसांनी तयार केला. गुन्हेशाखेचे उपायुक्त रंजन शर्मा, पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, पाटील आणि गुन्हेशाखेचा ताफा तसेच फॉरेन्सिकचे विशाल खांबेकर, श्री माळवी, शुक्रवारी सकाळी ९.३० ला जिल्हा न्यायालयाच्या इमारतीजवळ पोहचले. अनेक वकील आणि मान्यवरांसह अ‍ॅड. खांडेकरांचे नातेवाईकही यावेळी उपस्थित होते. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या माळ्यावरून प्रत्येकी दोन वेळा खंडाळकरांचा पुतळा खाली फेकण्यात आला. एकदा आत्महत्येसाठी उडी घेताना कशी स्थिती झाली आणि कुणी धक्का दिल्यास काय स्थिती राहील, कुठे आणि कशा जखमा होतील, त्याचा निष्कर्ष काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल सहा वेळा डमी खाली फेकला. दोन वेळा तो फाटला. त्यामुळे लगेच शिवून घेत डमीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक केले जात होते. प्रात्याक्षिकानंतरचे नमुने आणि काही अंदाज नोंदवत तब्बल २ तासानंतर पोलीस पथक तेथून बाहेर पडले. या संदर्भात माहितीसाठी पोलिसांशी संपर्क केला असता सातव्या माळ्यावर पोलिसांना आढळलेल्या अ‍ॅड खंडाळकरांच्या ‘फूट प्रिंट मॅच झाल्या‘, असे पोलिसांनी सांगितले. तज्ज्ञांकडून आलेल्या अहवालानंतरच पुढील निष्कर्ष काढता येईल, असे अधिकारी म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: 'Rehearsal' in District Court Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.