रस्त्यावरील मानसिक रुग्णांचे पुनर्वसन आवश्यक : कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 20:08 IST2020-05-18T20:05:05+5:302020-05-18T20:08:12+5:30
शहरात लॉकडाऊन असतानाही रस्त्याच्या कडेला व इतरही ठिकाणी घाणीने माखलेले, अर्धनग्न, केस विस्कटलेले स्वत:शीच बडबडत असलेले मानसिक रुग्ण दिसून येत आहेत. ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर यांनाही लागण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. यामुळे रस्त्यावरील मानसिकरीत्या आजारी बेघर रुग्णांची प्रादेशिक मनोरुग्णालयात तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निवेदन ‘ग्यात’ संस्थेतर्फे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व उपसंचालक आरोग्य विभागाला दिले आहे.

रस्त्यावरील मानसिक रुग्णांचे पुनर्वसन आवश्यक : कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात लॉकडाऊन असतानाही रस्त्याच्या कडेला व इतरही ठिकाणी घाणीने माखलेले, अर्धनग्न, केस विस्कटलेले स्वत:शीच बडबडत असलेले मानसिक रुग्ण दिसून येत आहेत. ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर यांनाही लागण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. यामुळे रस्त्यावरील मानसिकरीत्या आजारी बेघर रुग्णांची प्रादेशिक मनोरुग्णालयात तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निवेदन ‘ग्यात’ संस्थेतर्फे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व उपसंचालक आरोग्य विभागाला दिले आहे.
मानसिक रुग्णांना योग्य उपचार मिळाले तर ते बरे होऊ शकतात. परंतु याबाबत जागरूकता नसल्याने काही कुटुंबांसाठी अशा रुग्णांना सांभाळणे अवघड होते. परिणामी, त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. ग्यात संस्थेने शहरात फिरून अशा रुग्णांची माहिती घेऊन ती जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मनपा आयुक्तांना दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अशा रुग्णांना बेघर निवारा केंद्रात ठेवणे अयोग्य ठरेल. केंद्राच्या रोजच्या कार्यात अडथळा येण्याची व इतरांना त्रास होण्याची शक्यता आहे. येथे अशा रुग्णांना पाहण्याचे प्रशिक्षणप्राप्त कर्मचारी नसल्याने अडचणीचे जाईल. यामुळे ‘लॉकडाऊन’ असेपर्यंत यांचे तात्पुरते पुनवर्सन प्रादेशिक मनोरुग्णालयात करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, दुर्लक्ष करून त्यांना रस्त्यावरच सोडल्यास इतरांच्या तुलनेत त्यांना सर्वाधिक कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. शिवाय, आपली लक्षणे सांगता येणार नसल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळणेही कठीण आहे. या रुग्णांची तपासणी होण्याची शक्यता कमी असल्याने इतरांना लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे यांचे तातडीने पुनर्वसन होणे आवश्यक आहे. पुनर्वसनापूर्वी त्यांची तपासणी होणेही गरजेचे आहे. अशा रुग्णांना शोधून काढून त्यांची माहिती देण्यासाठी ग्यात संस्था मदत करेल, असेही निवेदनात म्हटले आहे.