शिवणगावातील २३१ कुटुंबांना पुनर्वसनाचा लाभ
By Admin | Updated: August 8, 2014 01:08 IST2014-08-08T01:08:52+5:302014-08-08T01:08:52+5:30
शिवणगावातील २३१ कुटुंबांना गावठाणाबाहेर दाखविण्यात आल्यामुळे त्यांना पुनर्वसनाच्या फायद्यापासून वंचित राहावे लागणार होते. परंतु त्या सर्व कुटुंबांना गावठाणात समाविष्ट करून त्यांना

शिवणगावातील २३१ कुटुंबांना पुनर्वसनाचा लाभ
फडणवीस यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
नागपूर : शिवणगावातील २३१ कुटुंबांना गावठाणाबाहेर दाखविण्यात आल्यामुळे त्यांना पुनर्वसनाच्या फायद्यापासून वंचित राहावे लागणार होते. परंतु त्या सर्व कुटुंबांना गावठाणात समाविष्ट करून त्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन आमदार देवेंद्र फडणवीस यांना एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले.
कार्गोहब बाधित शेतकरी आणि रहिवाशांच्या विविध मागण्यांबाबत आमदार देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेतली. बैठकीत शिवणगावातील विक्तुबाबानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना ३५० चौरस फूट जागा न देता त्यांच्या ताब्यात असलेल्या भूखंडाएवढा भूखंड देण्याची मागणी आ. फडणवीस यांनी केली. यावर एक प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाला पाठविण्याचे आश्वासन एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले. मिहान परिसरातील शेतकरी, बिगर शेतकरी या प्रलंबित मुद्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशानुसार ११०३ शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवणगाव, जयताळा, भामटीच्या नागरिकांच्या पुनर्वसनातील अडचणी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन करावी, या आ. फडणवीस यांच्या मागणीला जिल्हाधिकारी आणि एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी मान्यता देऊन तेथील प्रकल्पग्रस्तांना १५ दिवसात मोजणी करून भूखंड हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. येथील भू-संपादनातील अडचणीबाबतचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, एमएडीसीचे मुख्य अभियंता चहांदे, संयुक्त नागरिक कृती समितीचे विजय राऊत, किशोर वानखेडे, संजय महल्ले, प्रकाश भोयर आणि शिवणगाव, जयताळा, भामटी परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)