गर्भपातासाठी १,६५० कुमारी मातांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:47 IST2018-02-12T22:45:03+5:302018-02-12T22:47:30+5:30
उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पावणेसहा वर्षांमध्ये १ हजार ६५० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी चार कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

गर्भपातासाठी १,६५० कुमारी मातांची नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पावणेसहा वर्षांमध्ये १ हजार ६५० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी चार कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी कुमारी मातांसंदर्भात मनपाकडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१२ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत कुमारी मातांची झालेली नोंदणी, यादरम्यान झालेले मृत्यू, मनपाच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. माहितीच्या अधिकाराबाबत नागपूर महानगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१२ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये गर्भपातासाठी १ हजार ६५० कुमारी मातांनी नोंदणी केली. सर्वात जास्त ४७२ मातांची नोंदणी २०१३-१४ या कालावधीत झाली. या कालावधीदरम्यान ४ कुमारी मातांचा मृत्यू झाला. यातील एक कुमारी माता अल्पवयीन होती. या कालावधीत ५६ खासगी ‘एमटीपी’ केंद्रांची नोंदणी झाली. मागील वर्षभरात नोंदणीचा आकडा १४ इतका होता.
मनपा दवाखान्यात ९८४ गर्भपात
दरम्यान, मनपातर्फे चालविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सूतिकागृह येथे एकूण ९८४ गर्भपात झाले. यातील ५९६ गर्भपात पाचपावली सूतिकागृहात झाले.
कुमारी मातांची आकडेवारी
वर्ष संख्या
२०१२-१३ ३२४
२०१३-१४ ४७२
२०१४-१५ १८९
२०१५-१६ २६०
२०१६-१७ २५६
एप्रिल ते डिसेंबर २०१७ १४९