भाजपा नेते मुन्ना यादव यांच्यावर ३०७ लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:33 IST2018-03-16T22:33:38+5:302018-03-16T22:33:52+5:30
राज्य इमारत बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष व भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनी हल्ला प्रकरणात दाखल दोषारोपपत्रात भादंवितील कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न)चा समावेश करण्यासाठी विरोधी गटातील गीता यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

भाजपा नेते मुन्ना यादव यांच्यावर ३०७ लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य इमारत बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष व भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनी हल्ला प्रकरणात दाखल दोषारोपपत्रात भादंवितील कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न)चा समावेश करण्यासाठी विरोधी गटातील गीता यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. राजकीय दबावामुळे दोषारोपपत्रातून हे कलम वगळण्यात आले असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकेवर येत्या मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
२१ आॅक्टोबर २०१७ रोजी मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन फटाके फोडत असताना त्यांना विरोधी गटातील मंजू यादव यांनी हटकले होते. त्यामुळे मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांनी विरोधी गटातील यादव कुटुंबीयांना धारदार शस्त्रांनी जखमी केले. तसेच, जबर मारहाण व शिवीगाळ केली. धंतोली पोलिसांनी अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या तक्रारीवरून मुन्ना यादव, लक्ष्मी यादव, करण यादव, अर्जुन यादव, बाला यादव, जग्गू यादव, सोनू यादव व इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ यासह विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला होता. परंतु, दोषारोपपत्रातून हे कलम हटविण्यात आले. याचिकाकर्तीतर्फे अॅड. रजनीश व्यास कामकाज पाहणार आहेत.