वाहतूक नियमांच्या बाबतीत नागपुरकर ‘बेपर्वा’ , साडेपाच वर्षात 20 लाखांहून अधिक नागरिकांनी तोडले नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 21:41 IST2017-08-23T21:37:22+5:302017-08-23T21:41:54+5:30
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक नियमांच्या बाबतीत नागपुरकर ‘बेपर्वा’ , साडेपाच वर्षात 20 लाखांहून अधिक नागरिकांनी तोडले नियम
नागपूर, दि. 23 - नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या साडेपाच वर्षांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी २० लाखांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली. विशेष म्हणजे हे प्रमाण वाढत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात २०१२ पासून किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती पोलीस हेल्मेट न घालता सापडले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१२ ते ३० जून २०१७ या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी २० लाख ५८ हजार ६५७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. सर्वाधिक कारवाई २०१६ साली करण्यात आली. या वर्षात ५ लाख १५ हजार ३७० नागरिकांना दंड ठोठावण्यात आला तर २०१७ मधील पहिल्या ६ महिन्यातच ३ लाख ३ हजार ७५५ नागरिकांवर कारवाई झाली. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचे प्रमाण वाढतच जात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. साडेपाच वर्षांच्या कालावधीत नागरिकांकडून २९ कोटी २५ लाख १४ हजार ९६२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील गाडी चालवून नियमांचे उल्लंघन करणा-या ११ हजार ७५ महाभागांवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे नियम तोडणाºयांविरोधातील कारवाईमध्ये सातत्याने वाढच होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. २०१५ मध्ये १९८१ जणांवर कारवाई झाली तर २०१६ मध्ये हाच आकडा १६७८ इतका होता. २०१७ मधील पहिल्या ६ महिन्यांत २,२०२ नागरिक कचाट्यात सापडले.