महानिर्मितीतील कामगारांना लस देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:36+5:302021-04-05T04:08:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : वीज निर्मितीचा अत्यावश्यक सेवेत समावेश असून, लाॅकडाऊन काळात वीज निर्मिती सुरू असल्याने कामगार कामावर ...

महानिर्मितीतील कामगारांना लस देण्यास नकार
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : वीज निर्मितीचा अत्यावश्यक सेवेत समावेश असून, लाॅकडाऊन काळात वीज निर्मिती सुरू असल्याने कामगार कामावर जात हाेते. शासनाने फ्रन्ट लाईन वर्करचे काेराेना लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. यात वयाची काेणतीही अट नाही. त्याअनुषंगाने काेराडी (ता. कामठी) येथील महानिर्मितीच्या वीज प्रकल्पातील काही कामगार काेराडी-महादुला येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पाेहाेचले. मात्र, त्यांना ते फ्रन्ट लाईन वर्कर नसल्याचे सांगून लस न देता परत पाठविण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी वीज वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना फ्रन्ट लाईन वर्कर समजून वयाची अट न ठेवता त्यांचे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, महानिर्मितीतील कामगारांना लस न देता परत पाठविण्यात आल्याने हा प्रशासकीय स्तरावर मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. दुसरीकडे, या कामगारांना फ्रन्ट लाईन वर्कर समजून त्यांचे तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी महादुला नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी केली आहे.
वीज निर्मिती अत्यावश्यक सेवा समजली जात असून, विजेच्या उत्पादनासाठी केंद्रात कर्मचाऱ्यांसह कामगारांना कामावर नियमित जावे लागत आहे. वीज केंद्रातील कामगारांना या काळात कामावरून कमी करणे किंवा त्यांच्याकडून वर्क फ्राॅम हाेम करवून घेणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांसह कामगारांना काेराेनाची लागण झाल्यास अथवा वीज केंद्र हाॅटस्पाॅट बनल्यास विजेचे उत्पादन थांबवावे लागेल. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. त्यामुळे या कामगारांचे लसीकरण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. लसीकरणाबाबत आराेग्य विभागाने नागपूर शहराबाबत ही सहानुभूती दाखवली, तेवढी तत्परता ग्रामीण भागाबाबत दाखविली नाही.
काेराडी वीज केंद्रातील अनेक कर्मचारी व कामगार काेराडी-महादुला येथील लसीकरण केंद्रावर गेले असता, त्यांना वैद्यकीय अधिकारी राहुल राऊत यांनी ४५ वर्षांची अट सांगून लस देण्यास नकार दिला. आपल्याला जिल्हा प्रशासनाकडून तसे आदेश नसल्याचेही डाॅ. राहुल राऊत यांनी स्पष्ट केले. वास्तवात, काेराडी वीज केंद्रात किमान पाच हजार कर्मचारी व कामगार सध्या कार्यरत आहेत. ते सर्व काेराडी व महादुला भागात वास्तव्याला आहेत. यातील ५० टक्के कामगार ४५ वर्षांवरील आहेत. त्यामुळे उर्वरित ५० टक्के कर्मचारी व कामगारांचे काेराेना लसीकरण करणेही गरजेचे आहे.
....
फ्रन्ट लाईन वर्कर नाही
वीज निर्मिती कार्यात बाधा निर्माण हाेऊ नये, यासाठी उर्वरित कर्मचारी व कामगारांना प्राथमिकतेने लस देण्यात यावी असे मत वीज केंद्राचे मुख्य अभियंत राजेश पाटील यांनी व्यक्त केले. दुसरीकडे, यासंदर्भत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून ४५ वर्षांखालील कर्मचारी व कामगारांना लस देण्याची विनंती केली हाेती, अशी माहिती वीज केंद्रातील उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजुरकर यांनी दिली. मात्र, जिल्हा प्रशासन या कामगारांना फ्रन्ट लाईन वर्कर मानण्यास तयार नसल्याने त्यांनी नवल व्यक्त केले.
...
एकाच नियमात तफावत
याच केंद्रातील काही ४५ वर्षांखालील कामगारांनी नागपूर शहरात लसीकरण करवून घेतले आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने त्यांना फ्रन्ट लाईन वर्कर मानून लसीकरणात प्राधान्य दिले. ग्रामीण भागात मात्र याच नियमात तफावत निर्माण केली जात आहे. वीज निर्मिती ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यात काम करणाऱ्या कामगारांना जिल्हा प्रशासनाने फ्रन्ट लाईन वर्कर मानले पाहिजे. वयाची काेणतीही अट न ठेवता त्यांचे लसीकरण केले पाहिजे, असे मत नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी व्यक्त केले.