मुकेश सारवान यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील २५ वर्षांपासून सेवेत असलेल्यांना नोकरीत कायम करावे, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन व सवलती द्याव्या, सरकारच्या लाड कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून त्यांच्या वारशांना सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माजी अध्यक्ष मुकेश सारवान यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सारवान राज्याचा दौरा करीत आहेत. आज, सोमवारी महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सुविधांसदर्भात आढावा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मनपात व राज्य स्तरावर सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. श्रम साफल्य योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. शैक्षणिक पात्रता असलेल्यांना वर्ग ३ मध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी सारवान यांनी केली. यावेळी शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर समुद्रे, जिल्हाध्यक्ष चंदाबाई खरे, सिकंदर मर्दाने, ईश्वरसिंग नाहाट, जयंत सारवान, राजेश सारवान, विष्णू व्यास यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. लाड पागे कमिटीची गत काळातील ५१९ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती किशोर समुद्रे यांनी दिली.