पंतप्रधानांच्या सभेसाठी मौदा सज्ज
By Admin | Updated: August 21, 2014 01:09 IST2014-08-21T01:09:47+5:302014-08-21T01:09:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मौदा एनटीपीसी वीज प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

पंतप्रधानांच्या सभेसाठी मौदा सज्ज
चंद्रशेखर बावनकुळे : वॉटर प्रूफ शामियाना उभारला
मौदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मौदा एनटीपीसी वीज प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघाचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी मौदा एनटीपीसी परिसर सज्ज असून स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि स्थानिक पोलिसांनी बुधवारी मॉकड्रील केली.
जाहीर सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. कृपाल तुमाने उपस्थित राहतील. जाहीर सभेसाठी नगारिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. जाहीर सभेसाठी येताना वाहनधारकांनी बाबदेव साखर कारखाना आणि मौदा एनटीपीसी प्रकल्पालगतच्या मैदानात वाहन पार्किंग करावी, गैरसोय आणि गर्दी टाळण्यासाठी किमान एक तास आधी जागा राखून घ्यावी, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ. बावनकुळे यांनी केले.
पोलीस प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या असून त्याचे पालन करावे. कार्यक्रमस्थळी बॅग, पिशवी, कॅमेरा, बॉटल आदी साहित्य आणण्यावर बंदी असल्याचे कळविले आहे.
मौदा एनटीपीसी प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला गती मिळाली. प्रकल्पाने बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पुरेसा मोबदला मिळवून देण्याचा आपण प्रयत्न केला.
प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पात टप्प्याटप्प्याने नोकरीत सामावून घेण्यात येत असून कुशल, अकुशल, तांत्रिक आणि तंत्रज्ञ प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येत आहे. प्रकल्पबाधित कुंभारी, धामणगाव, आजनगाव, कुंभारगाव आणि कुंभापूर या गावांचेन पुनर्वसन करण्यात येणार आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासन-एटीपीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रसगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री गोयल यांच्याशी भेटून मार्ग काढू, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)