प्रतिक्रांतिविरुद्ध लढण्यासाठी सज्ज राहा
By Admin | Updated: January 18, 2015 00:54 IST2015-01-18T00:54:51+5:302015-01-18T00:54:51+5:30
तथागत गौतम बुद्ध यांनी या देशात सर्वप्रथम क्रांती घडवून आणली. परंतु जातीयवादी शक्तींना ते मानवले नाही. त्यांनी त्याविरोधात प्रतिक्रांति केली आणि बौद्ध धम्म या देशातूनच नष्ट केला.

प्रतिक्रांतिविरुद्ध लढण्यासाठी सज्ज राहा
बुद्ध महोत्सवाचे उद्घाटन : धम्मचारी सुभूती यांचे प्रतिपादन
नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांनी या देशात सर्वप्रथम क्रांती घडवून आणली. परंतु जातीयवादी शक्तींना ते मानवले नाही. त्यांनी त्याविरोधात प्रतिक्रांति केली आणि बौद्ध धम्म या देशातूनच नष्ट केला. तब्बल १५०० वर्षे बौद्ध धम्म या देशातच नव्हता. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ मध्ये पुन्हा क्रांती घडवून आणली आणि बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले. मात्र प्रतिक्रांति करणारी शक्ती आजही कायम असून ती मजबूत आहे. तेव्हा या प्रतिक्रांति विरुद्ध लढण्यासाठी आजच्या पिढीला क्रांती समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इंग्लंडमधील प्रसिद्ध लेखक धम्मचारी सुभूती यांनी येथे केले.
त्रिरत्न बुद्ध महासंघाच्या नागपूर बुद्धिस्ट सेंटरच्यावतीने दीक्षाभूमीवर आयोजित पाचव्या बुद्ध महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख प्रवचनकार म्हणून ते बोलत होते. त्यांच्या इंग्रजी प्रवचनाचा हिंदी अनुवाद मैत्रीवीर नागार्जुन यांनी केला. याप्रसंगी चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, डॉ. त्रिलोक हजारे, धम्मचारी साधना रत्न, धम्मचारी अमृतासिद्धी, धम्मचारी मैत्रेयसागर प्रमुख अतिथी होते.
धम्मचारी सुभूती म्हणाले, तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी या देशात जातपात, भेदाभेद असे अनेक प्रकार होते. परंतु तथागत गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातून समाजात क्रांती केली. सर्व मनुष्य समान आहेत. त्याच्यात कुठलाही फरक नाही, हा विचार सर्व प्रथम त्यांनी मांडला. या विचारांनी समाजात व संपूर्ण देशात क्रांती घडवून आणली. ही क्रांती जगभर पसरली. मात्र त्याविरोधात प्रतिक्रांति करण्यात आली आणि ते यशस्वी झाले. अतिशय कष्टांनी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने आपल्याला बुद्धाचा धम्म मिळाला आहे. त्यामुळे आता प्रतिक्रांति यशस्वी होऊ द्यायची नाही. त्यामुळे नवीन पिढीने बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना समजून घेणे गरजेचे आहे. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांनीच आता आपण पुढे जायचे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक डॉ. सुनील तलवारे यांनी केले. संचालन ऋतायुष यांनी केले. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमी बौद्धांचे सारनाथ
महोत्सवाचे उद्घाटन करताना भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई म्हणाले, दीक्षाभूमी ही बौद्धांचे सारनाथ होय. त्यामुळे या पवित्र भूमीचे रक्षण आम्हा सर्वांनी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व बौद्धबांधवांनी आणि विविध संघटनांनी मिळून काम करावे, असे आवाहन भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी महोत्सवाचे उद्घाटक म्हणून केले.
आज उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाची मेजवानी
बुद्ध महोत्सवाला सुरुवात झाली असून दीक्षाभूमीवर उद्या रविवारपासून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता विश्वविख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाचा आनंद नागपूरकर रसिकांना उपभोगता येईल.